पुणे : कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ यांना पश्चिम महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. शहरी भागाचे प्रतिनिधित्व करतानाच कुस्तिगीर परिषदेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात सक्रीय असलेले मोहोळ यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी मोहोळ कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. पण चंद्रकांत पाटील यांच्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. प्रारंभी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि अनिल शिरोळेसमर्थक अशी ओळख असलेले मोहोळ आता राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम महाराष्ट्रात अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मोहोळ यांना राज्यमंत्रिपद मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. सातारचे उदयनराजे भोसले यांचे नाव चर्चेत असतानाच मोहोळ यांनी मंत्रिपदाच्या स्पर्धेत आघाडी घेतली.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून पहिल्यापासूनच त्यांच्या नावाला पसंती होती. त्यानुसार, ते निवडणुकीत उतरले, लढले आणि त्यांनी पुणे लोकसभेचा आखाडाही गाजवला. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे.
हेही वाचा…‘विकास पुरूष’ नितीन गडकरी यांची केंद्रीय मंत्रिपदाची हॅटट्रिक
मुळशी तालुक्यातील मुठा गावचे मोहोळ कुटुंबीय नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी १९८५ च्या सुमारास पुण्यातील कोथरूड परिसरात स्थायिक झाले. मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. पुण्यात प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर कुस्तीसाठी ते कोल्हापूरला गेले. आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावराच्या आखाड्यापर्यंत त्यांनी मजल मारली. कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परतले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात १९९३ च्या सुमारास प्रवेश झाला. या दरम्यान, माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या ते संपर्कात आले आणि त्यांनी राजकीय आखाडाही गाजविण्यास सुरुवात केली.
हेही वाचा…दलित मते डोळ्यांसमोर ठेवूनच रामदास आठवले यांना मंत्रिपद
पक्ष संघटनेत सरचिटणीस, वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली. स्मार्ट सिटी आणि पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.