सुजित तांबडे
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. कसब्याचा धडा विचारात घेऊन सावध झालेल्या भाजपकडून उमेदवार निवडीचे निकष ठरवत तीन नावांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. कसब्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी घेत बापट यांच्या स्नूषा स्वरदा बापट यांना, तर शहरात बहुजन मतदारांची संख्या लक्षात घेऊन माजी खासदार संजय काकडे आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीबाबत भाजपच्या प्रदेश पातळीवर विचारविनिमय सुरू झाला आहे.
कसब्याचा निकाल हा भाजपच्या विरोधात गेल्यानंतर सतर्क झालेली भाजप लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करू लागली आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरून नावे निश्चित करून ती नावे केंद्रीय पातळीवर पाठविण्यात येणार आहेत. त्यातून प्रदेश पातळीवरून उमेदवार जाहीर केला जाणार आहे. उमेदवारीसाठी बापट यांचे पुत्र गौरव किंवा स्नूषा स्वरदा, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी मुळीक यांना ‘भावी खासदार’ म्हणून लावलेले फलक अडचणीचे ठरले आहेत. कुलकर्णी आणि शिरोळे ही नावे मागे पडली असून, स्वरदा बापट, काकडे आणि मोहोळ या तीन नावांना प्राधान्यक्रम देण्यात आल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
आणखी वाचा- सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अलिप्त, सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज?
कसब्याचा कटू अनुभव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत घ्यावा लागू नये, यासाठी बापट यांच्या कुटुंबीयांपैकी स्वरदा बापट यांना उमेदवारी देण्याचा पर्याय भाजपने ठेवला आहे. कसब्याची पोटनिवडणूक ही एका विधानसभा मतदार संघापर्यंत मर्यादित होती. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कसब्यासह अन्य पाच विधानसभा मतदार संघांतील मतदारांकडून पसंती देण्यात येईल, अशा उमेदवाराचीही चाचपणी भाजपने सुरू केली आहे. त्यामध्ये माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाचा समावेश आहे.
काकडे यांनी यापूर्वी राज्यसभेवर खासदार म्हणून काम केले आहे. त्याबरोबर पुणे महापालिकेमध्ये काकडेसमर्थक काही नगरसेवक आहेत. भाजपशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत. पुणे लोकसभा मतदार संघामध्ये समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांपैकी वडगावशेरीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि कसब्यात काँग्रेसचा आमदार आहे. शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे चार मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहेत. या मतदार संघांमध्ये मध्यमवर्गीय मतदारांबरोबरच झोपडपट्ट्यांमधील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. झोपडपट्टी असलेल्या भागात प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. कोथरुडमधील केळेवाडी, हनुमाननगर, जय भवनीनगर, किष्किंदानगर, शास्त्रीनगर, सुतारदरा हा भाग, पर्वतीतील जनता वसाहत, तळजाई टेकडी वसाहत, शिवाजीनगरमधील वडारवाडी, जनवाडी, गोखलेनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधील काशेवाडी, हरकानगर, लोहियानगर आदी भागांचा समावेश आहे. या परिसरात काकडे यांचा संपर्क असल्याने भाजपच्या पारंपरिक मतदारांबरोबरच ही मते मिळण्याची शक्यता असल्याने उमेदवारीसाठी काकडे यांच्या नावाला झुकतेमाप देण्यात आल्याचे समजते.
आणखी वाचा- नागपूरमधील वज्रमूठ सभेपूर्वीच काँग्रेसमध्ये बेकीचे वातावरण
बापट, काकडे यांच्याशिवाय मुरलीधर मोहोळ यांचेही नाव चर्चेत आहे. महापौर पदाच्या काळात त्यांनी केलेले काम आणि मागील विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून इच्छुक असतानाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी उमेदवारीचा त्याग केल्याने आता त्यांना लोकसभेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसमध्ये धंगेकर यांच्या नावाची चर्चा
काँग्रेसकडूनही उमेदवारांसाठी चर्चा सुरू झाली आहे. माजी आमदार मोहन जोशी यांच्याबरोबरच कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचाही पर्याय काँग्रेसने ठेवल्याची चर्चा आहे. भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, यावर काँग्रेसकडून उमेदवार निश्चित केला जाणार आहे. सध्या धंगेकर हे नाव चर्चेत असल्याने काँग्रेसकडून ऐनवेळी त्यांना उमेदवारी देण्याचा पर्यायही आल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.