कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले आहेत. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. त्यामुळे कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. पुण्यात प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर कुस्तीसाठी ते कोल्हापूरला गेले. आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावराच्या आखाड्यापर्यंत त्यांनी मजल मारली. कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परतले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात १९९३ च्या सुमारास प्रवेश झाला. या दरम्यान, माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या ते संपर्कात आले आणि त्यांनी राजकीय आखाडाही गाजविण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा-कोण आहेत लोकसभेचे ७ अपक्ष खासदार? त्यांची साथ एनडीएला की इंडिया आघाडीला?

पक्ष संघटनेत वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली. स्मार्ट सिटी आणि पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ मध्ये निवडणूक लढविली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muralidhar mohol who entered politics through bharatiya janata party has become the newly elected mp from pune print politics news mrj