उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात सांप्रदायिक तणाव वाढत असल्याबाबत जमीयत उलेमा-ए-हिंद संघटनेचे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदानी यांनी मंगळवारी (१३ जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. या पत्रात त्यांनी मागणी केली आहे की, १५ जून रोजी उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी जी महापंचायत आयोजित केली आहे, त्याला परवानगी देऊ नये. या महापंचायतीमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्याच दरम्यान मंगळवारी उत्तरकाशी प्रशासनाने महापंचायतीला सभा घेण्यास परवानगी नाकारली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री धामी यांनी समाजात विभाजन घडविणाऱ्या संघटनावर कारवाई करावी आणि राज्यातील जनतेच्या मालमत्ता व जीविताचे रक्षण करावे, अशी मागणीही असद मदानी यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.
शनिवारी (३ जून) रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात काही हिंदू संघटनांनी विविध ठिकाणी मोर्चे काढले होते. २६ मे रोजी पुरोला येथे दोन लोकांनी एका हिंदू मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या दोन लोकांपैकी एक व्यक्ती मुस्लीम होती. या घटनेचा निषेध काढण्यासाठी हे मोर्चे काढण्यात आले होते. मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला आणि आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या घटनेमुळे शहरात आणि इतर भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणानंतर ‘यमुना व्हॅली हिंदू जागृती संघटने’ने आवाहन केल्यानंतर स्थानिकांनी निषेध मोर्चा काढून बाजार बंद केले. या घटनेला ‘लव्ह जिहाद’चे नाव देण्यात आले. पुरोला भागात मुस्लीम समुदायाची जवळपास ४२ दुकाने आहेत. २६ मेपासून ही सर्व दुकाने बंद आहेत. तसेच ६ जून रोजी पुरोला भागातील दुकानांवर काही अज्ञात लोकांनी पत्रक चिटकवले होते. १५ जूनपर्यंत सदर दुकान सोडून जावे अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी या पत्रकावर देण्यात आली होती.