नागपूर : कट्टर हिंदुत्ववादी संघटनापासून अंतर राखत भाजपला मुस्लिम समुदायासोबत जोडण्यासाठी नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गत दहा वर्षांपासून सुरू केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना नागपुरात झालेल्या दंगलीमुळे धक्का बसला आहे.

नागपूरची दंगल काही वस्त्यांपुरतीच मर्यादित होती. पण या वस्त्या हिंदू – मुस्लिमांच्या एकोप्याचा प्रतिक म्हणून ओळखल्या जायच्या. कारण या वस्त्यांची रचनाच तशी आहे. अत्यंत दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येकाचा प्रत्येकाशी संबंध येतो. महाल हा जुन्या नागपुरातील भाग आहे. येथेच गडकरीचे जुने निवासस्थान आहे. अनेक वर्षे त्यांची या परिसरात गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असले तरी गडकरी यांनी स्वतःला त्यात कधीच बंदीस्त करून घेतले नाही. त्यामुळेच गडकरी भाजपमधील ‘सर्वसमावेशक’, सर्वधर्मसमभाव मानणारे नेते मानले जातात. त्यामुळेच ते २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा लोकसभेला उभे राहिले तेव्हा ते २ लाख ८५ हजार इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेसची व्होट बँक म्हणून ओळख असलेल्या दलित, मुस्लिम, आदिवासींसह सर्व समाज घटकांनी गडकरींच्या झोळीत घसघशीत मतांचे दान टाकले होते. ते टिकवून ठेवण्यासाठी गडकरींनी मागील दहा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. विशेषतः मुस्लिम समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी या समाजातील बुद्धीजीवींना सोबत घेतले. या समाजातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. दर महिन्याला होणाऱ्या जनता दरबारात मुस्लिमांची असणारी दखलपात्र संख्या ही गडकरी यांच्याविषयी या समाजात निर्माण होणारा विश्वास दर्शवतो. त्यामुळेच २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही गडकरी एक लाखांहून अधिक मताने विजयी होत गेले.

गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असले व संघाचे गडकरींवर प्रेम असले तरी भाजपमध्ये काम करताना गडकरींनी कट्टर हिंदुत्ववादी संघटनांना कधी जवळ केले नाही. निवडणूक प्रचारकाळातही त्यांनी या संघटनांपासून स्वतःला दूर ठेवले होते. मात्र यावेळी याच संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे दंगल उसळली व त्यात सर्वसामान्य नागपूरकर होरपळले. इरफान नावाचा तरुण रेल्वे स्थानकावर जात होता तो दंगेखोरांकडून मारला गेला. त्याच्या अंत्ययात्रेला उसळलेली हजारोंची गर्दी या समाजात दंगलीमुळे निर्माण झालेली संतप्त भावना दर्शवणारी होती.

दंगलीनंतर सोमवारपासून जनजीवन सुरळीत व्हायला लागले आहे. मात्र यामुळे दोन समाजात पडलेली दरी आणि दुभंगलेला सामाजिक सद्भभाव पुन्हा जागेवर येण्यासाठी दीर्घकाळ द्यावा लागणार आहे. कारण तो टिकून राहावा म्हणून गडकरींसारख्या नेत्यांनी आजवर केलेल्या प्रयत्नांना दंगलीमुळे धक्का बसला आहे.