मुंबई : काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी हे दोन अल्पसंख्याक समाजाचे सदस्य निवृत्त होत असल्याने विधान परिषदेतील मुस्लीम प्रतिनिधित्वच संपुष्टात आले आहे. विधान परिषदेला प्रतिनिधित्व नाकारले असले तरी विधानसभेसाठी मुस्लीम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेतील डॉ. मिर्झा आणि बाबाजानी हे दोघे निवृत्त होत असल्याने सध्या तरी वरिष्ठ सभागृहात मुस्लीम समाजाचा एकही आमदार नसेल. अनेक वर्षांनंतर अल्पसंख्याक समाजाचा एकही सदस्य विधान परिषदेत नसेल. विधान परिषदेत आतापर्यंत अल्पसंख्याक समाजाला काँग्रेसकडून कायमच प्रतिनिधित्व देण्यात येत असे. लोकसभा वा विधानसभेत निवडून येणे शक्य नसल्यास राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी मुस्लीम समाजातील नेत्यांचा विचार केला जायचा. यातूनच काँग्रेसने कायम अल्पसंख्याक समाजाला वरिष्ठ सभागृहात संधी दिली होती.

हेही वाचा >>>कारण राजकारण: शिंदे गायकवाड बेबनावामुळे पवारांचे ‘कल्याण’?

राष्ट्रवादीनेही फौजिया खान, बाबाजानी यांना विधान परिषदेची आमदारकी दिली होती. विधान परिषदेतील ११ सदस्य पुढील आठवड्यात निवृत्त होत आहेत. त्यांना दोनच दिवसांपूर्वी सभागृहात निरोप देण्यात आला. येत्या शुक्रवारी ११ जागांसाठी निवडणूक होत आहे.

योग्य प्रतिनिधित्व देण्याची मागणी

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या यशात मुस्लीम समाजाची मते निर्णायक ठरली. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत मुस्लीम समाजाचे प्रतिनिधित्व कायम राहील, अशी राज्यातील नेत्यांना अपेक्षा होती. पण पक्षाने निवृत्त होणाऱ्या डॉ. वजाहत मिर्झा अणि डॉ. प्रज्ञा सातव यापैकी सातव यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मुस्लीम समाजाची हक्काची जागा पक्षाने कायम ठेवली नाही, अशी काँग्रेस नेत्यांची भावना झाली आहे. विधानसभेत काँग्रेसच्या विरोधात अल्पसंख्याकबहुल भागात हा प्रचार होण्याची भीती नेत्यांना आहे. मुस्लीम समाजाला डावलण्यात आल्याबद्दल काँग्रेस नेते व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विधान परिषदेसाठी विचार झाला नसला तरी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना मुस्लीम समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व देण्याची मागणी दलवाई यांनी खरगे यांच्याकडे केली.

काँग्रेसने कायम अल्पसंख्याक समाजाला वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व दिले होते. यंदा प्रथमच एकही सदस्य अल्पसंख्याक समाजाचा नसेल.- नसीम खानकाँग्रेसचे माजी मंत्री

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim representation in the legislative council ends congress leaders hope to give proper representation in the assembly print politics news amy
Show comments