पंढरपूर : महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. निवडणून येईल हा निकष आहे. महाविकास आघाडी १८० जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तर महायुतीचा विरोधी पक्षनेता कोण होणार हे फडणवीस यांनी ठरवावे, अशी बोचरी टीकाही थोरात यांनी केली. या वेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
हेही वाचा >>> ठाणे : अक्षय शिंदे याचा मृतदेह पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दफन
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात अकलूज येथील कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी त्यांनी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भाजपावर टीका केली. भाजपाची कृती लोकशाही विरोधी आहे. ऑपरेशन लोटस याचा अर्थ पैसा द्यायचा व आमदार फोडायचा असा आहे. जनतेला भाजपाची नीती समजली आहे असे ते म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांना मोठी संधी मिळाली होती. त्यांच्याकडे क्षमता आहे. भाजपात जाऊन चुकले असे वाटते. त्यांचे व्यक्तिमत्त्व काँग्रेस विचारसरणीत घडले आहे, असे म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांची पाठराखण केली.
‘मराठा समाजाला न्याय मिळावा’
मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी या बाबत प्रयत्न केले. आमची सत्ता गेली. त्यानंतर न्यायालयात बाजू मांडली नाही. मात्र १६ टक्के आरक्षण देणे शक्य आहे असे थोरात म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण व संधी मिळाली पाहिजे मग कोणत्याही पद्धतीने मिळावी असे त्यांनी मत मांडले. राज्यात महायुती बाबत नाराजी आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असल्याचे थोरात यांनी सांगितले.