राज्यसभेच्या माजी खासदार आणि बॉक्सिंग चॅम्पियन एमसी मेरी कोम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करून मणिपूरमधील त्यांच्या कोम जमातीच्या गावात सुरू असलेल्या गोळीबाराचा मुद्दा मांडला. मेरी कोम यांच्या कांगथेई गावासह चुराचंदपूर आणि बिष्णुपूर जिल्ह्यालगतच्या भागात जोरदार गोळीबार सुरू असताना त्यांनी गुरुवारी (३१ ऑगस्ट) हे पत्र लिहिले. माजी खासदार कोम यांनी अमित शाह यांना सांगितले की, मणिपूरमध्ये ३ मे रोजी कुकी-झोमी आणि मैतेई समुदायामध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर ‘कोम’ समुदायही त्यात भरडला गेला आहे. तसेच या मंगळवारी (२९ ऑगस्ट) पुन्हा एकदा हिंसाचाराची सुरुवात झाली, त्यामध्ये गुरूवारी सहा लोकांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगंगखलावई, कांगथेई, खुसबुनग, थम्नापोकपी आणि एल.फेनोम याठिकाणी गोळीबार करण्याच्या घटना घडल्या आहेत.
“कोम समुदायापैकी कोणतेही गाव सशस्त्र स्वयंसेवकांसह बंकर्समध्ये सामील नाही, पण कोम समुदायाचे लोक दोन प्रतिस्पर्धी समुदाय राहत असलेल्या ठिकाणी राहतात. त्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये जेव्हा संघर्ष उफाळतो, तेव्हा कोम समुदायाबाबत शंका व्यक्त केली जाते. त्यामुळे कोम समुदायाची नेहमीच अडचण होते. याहूनही भयंकर बाब म्हणजे, कमकुवत प्रशासन आणि संख्येने लहान असलेल्या कोम समुदायाला नेहमीच इतरांच्या घुसखोरीचा फटका बसत आला आहे. आमच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या कोणत्याही शक्तींविरुद्ध आम्ही ठामपणे उभे राहू शकलेलो नाहीत”, अशी भावना मेरी कोम यांनी पत्रात लिहिली आहे.
हे वाचा >> मणिपूर हिंसाचार : कुकी आणि मैतेई हे समाज नेमके कोण आहेत ?
माजी खासदार मेरी कोम यांनी कोम गावांमध्ये होत असलेला हिंसाचार रोखण्यासाठी सुरक्षा दलाची मदत मागितली आहे. आमच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा दलाने निःपक्षपातीपणाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशीही विनंती कोम यांनी केली.
मेरी कोम पुढे लिहितात की, कोम समुदायाने आतापर्यंत आपली तटस्थता जपली आहे. “आम्ही नागा किंवा कुकी जमातींपैकी नाहीत. अनेक पिढ्यानपिढ्या आम्ही आमची हीच भूमिका मांडत आलो आहोत”, असेही त्या म्हणाल्या. मणिपूरमधील ३५ आदिवासी जमातींपैकी एक कोम समुदाय आहे. २०११ च्या जनगणनेनुसार कोम समुदायाची लोकसंख्या फक्त १४ हजार एवढी होती. इतर आदिवासी जमाती डोंगराळ जिल्ह्यांमध्ये स्थायिक झालेल्या आहेत, तर कोम जमात ही मुख्यतः इम्फाळ खोऱ्याच्या आसपासच्या भागात राहते.
“बहुतेक कोम गावे हे कुकी आणि मैतेई गावांच्या मध्यभागी आहेत. हिंसाचार भडकल्यापासून आम्ही दोन्ही गटांच्या लढाईत भरडले गेले आहोत. त्यामुळे कोम समुदायाला त्यांची घरे सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही”, अशी प्रतिक्रिया कोम नेत्याने त्याचे नाव उघड न करण्याच्या अटीवर द इंडियन एक्सप्रेसला दिली. या नेत्याने सांगितले की, कुकी आणि मैतेई हे दोन्ही समुदाय कोम समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. कोम समुदाय प्रतिस्पर्धी गटाला मदत करत असल्याची शंका घेतली जाते. आम्ही एका अवघड परिस्थितीत अडकलो आहोत. दोन्ही बाजूंनी जेव्हा हे दोन समुदाय आमच्या विरोधात उभे राहतात, तेव्हा आम्ही काहीच करू शकत नाही, अशी खंत या नेत्याने व्यक्त केली.
हे वाचा >> कुकी समुदायाला शांत करण्यासाठी मणिपूर सरकारचा मोठा निर्णय; कुकी-मैतेई संघर्ष थांबणार?
मेरी कोम यांनी आपल्या पत्रात मणिपूरमधील प्रत्येक नागरिकाला आवाहन केले आहे. विशेषतः मैतेई आणि कुकी-झोमी लोकांना त्यांनी म्हटले की, आपसातले मतभेद बाजूला ठेवून आता राज्यात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपल्या सर्वांना इथे एकत्र राहायचे आहे, त्यामुळे हे वाद संपवून सर्वांनी एकत्रितपणे राहावे.