Thalapathy Vijay : तमिळ सुपरस्टार थलापती विजयने काही महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. सर्वात विशेष म्हणजे या अभिनेत्याने दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश न करता थेट स्वत:चा पक्षच स्थापन केला. त्यामुळे सोशल मीडियासह देशभरात थलापती विजयची मोठी चर्चा झाली. दरम्यान, ‘तमिलगा वेत्री कझगम’ (TVK) असं विजय थलापतीच्या पार्टीचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीत ‘तमिलगा वेत्री कझगम’ पक्षानं कोणत्याही राजकीय गटाला पाठिंबा दिला नाही. मात्र, येत्या काळात थलापती विजयचा पक्ष महत्वाचा ठरणार असल्याचा अनेकांना विश्वास आहे. तसेच विजयच्या राजकारणातील प्रवेशामुळे तामिळनाडूतील सध्याचं राजकारण बदलेल असा अनेकांना विश्वास वाटतो. मात्र, नाम तमिलियार कच्ची (एनटीके) पक्षाचे नेते सीमन यांनी क्रांतिकारक समाजसुधारक पेरियार यांच्याबाबत केलेल्या एका भाषणानंतर सध्या तामिळनाडूचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
सीमन यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने देखील निघाली आहेत. काही ठिकाणी मोठा गोंधळ झाला तर काही ठिकाणी हाणामारी झाली असून त्यांच्यावर ७० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सीमन यांनी समाजसुधारक पेरियार यांच्यासंदर्भात बोलताना त्यांनी धार्मिक धर्तीवर तमिळ समाजात फूट पाडल्याचा आरोप केला आहे. मात्र, त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी निषेध व्यक्त केला आणि पेरियार यांनी धार्मिक रूढीवादाच्या विरोधात लढा दिल्याचे सांगितले. दरम्यान, सत्ताधारी पक्ष द्रमुकचे सरचिटणीस दुराई मुरुगन यांनी यावरून मोठा इशारा दिला आहे.
दुराई मुरुगन यांनी म्हटलं की, राज्यातील शांतता भंग झाल्यास कायदा-कायद्याचं काम करेल. पण स्वत:ला तमिळ राष्ट्रवादी समजणारे सीमन हे वेगळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर सीमन यांनी ९ डिसेंबर रोजी वडालूर येथे केलेल्या भाषणानंतर वादाला सुरुवात झाली होती. सीमन यांनी भाषणात पेरियार यांच्या तमिळ भाषा, धर्माबद्दलच्या मतांविरुद्ध भाष्य केलं होतं. त्यांच्या भूमिकेनंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं.
यानंतर पुद्दुचेरीमध्ये प्रादेशिक पक्ष थंथाई पेरियार द्रविड कळघम (TPDK)च्या नेत्यांनीही यावर टीका केली. तसेच काही समर्थकांनी टीपीडीकेच्या कार्यकर्त्यांनी एनटीकेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद मिटला. दरम्यान, त्यानंतर १६ डिसेंबर रोजी चेन्नई येथे एका भाषणात सीमन यांनी पुन्हा पेरियार यांच्या संदर्भात भाष्य केलं. त्यानंतर मात्र संपूर्ण राज्यभरातील विविध ठिकाणी निदर्शने निघाले. तसेच सीमन यांच्या चेन्नईतील निवासस्थानी अनेक संघटनांनी निदर्शने करत निषेध केला. निदर्शने केल्यानंतर त्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्यामुळे तणाव कमी झाला. मात्र, यानंतरही सीमन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी म्हटलं की मी माझ्या मतावर ठाम आहे आणि माझ्या मतावरून मी कुठेही मागे हटणार नाही.
दरम्यान, ‘एनटीके’मध्ये सीमन यांच्या हुकूमशाही नेतृत्वशैलीचा दाखला देत पक्षाच्या अनेक जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी गेल्या पाच महिन्यांत राजीनामे दिले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘एनटीके’ तामिळनाडूमधील १२ मतदारसंघांमध्ये १ लाख मते मिळवण्यात यशस्वी झाली. दरम्यान, अभिनेता विजयच्या तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाच्या उदयादरम्यानच ‘एनटीके’चे नेचे सीमनने पेरियार यांच्यावर आपली भूमिका मांडली. त्यामुळे येत्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूच्या राजकारणातील समीकरणे बदलू शकतात.