इशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सध्या येथे मतमोजणी सुरू असून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे मतमोजणी सुरू असताना दुसरीकडे सरकारची स्थापना करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपा आपल्या मित्रपक्षांसह सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर मेघालयमध्येही सत्तेचा भाग होण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लागोपाठ तीन विजयांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला

नागालँडमध्ये भाजपाची सत्ता

भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांकडून या तीन राज्यांच्या सरकार स्थापनेवर विचारविनिमय केला जात आहे. त्रिपुरा राज्यात सध्या भाजपा आघाडीवर आहे. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आले तर काय करावे, हा प्रश्न भाजपासमोर अद्याप कायम आहे. मेघालय राज्यात नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) पक्ष आघाडीवर आहे. मात्र येथेदेखील एनपीपीला स्पष्ट बहुमत मिळेला का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागालँडमध्ये भाजपाचे युती सरकार येण्याची शक्यता आहे. येथे नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) आणि भाजपा आघाडीवर आहेत. या दोन्ही पक्षांची येथे युती आहे.

हेही वाचा >>> ‘काँग्रेसमध्ये कर्नाटकच्या नेत्यांवर अन्याय,’ मोदींच्या आरोपांना शिवकुमार यांचे जशास तसे उत्तर; येडियुरप्पांचा उल्लेख करत म्हणाले…

त्रिपुरामध्ये भाजपा जिंकण्याची शक्यता

त्रिपुरा राज्यात विधानसभेच्या एकूण ६० जागांसाठी निवडणूक झाली होती. येथे बहुमतासाठी ३० हा आकडा पार करणे गरजेचे आहे. त्रिपुरामध्ये भाजपा निवडणूक जिंकण्याची दाट शक्यता आहे. मात्र सरकार स्थापनेसाठी येथे भाजपाला अन्य पक्षांना सोबत घेण्याची गरज भासू शकते. त्यासाठी भाजपाकडून योग्य ती पावलेदेखील उचलली जात आहेत. त्रिपुरामध्ये कोणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास प्रद्योत माणिक्य देवबर्मा यांच्या टिपरा मोथा पक्षाला चांगलेच महत्त्व प्राप्त होणार आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे-अरविंद केजरीवाल बैठकीचा अर्थ काय? मुंबई पालिका निवडणुकीसाठी युती होणार?

मेघालयमध्ये सरकार स्थापनेसाठी बैठका अन् चर्चा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी या तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये लक्ष घातले होते. सध्या या तीन राज्यांत भाजपाची सत्ता कशी स्थापन करता येईल, यासाठी स्थानिक नेत्यांशी विचारविनिमय सुरू आहे. मेघालयमध्ये सध्या एनपीपी पक्ष आघाडीवर आहे. एनपीपीला सोबत घेऊन येथे सरकार स्थापनेचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्मा यांनी मंगळवारी एनपीपी पक्षाचे कर्नाड संगमा यांच्याशी चर्चा केली आहे. मेघालयमध्ये भाजपा आणि एनपीपी यांची सत्ता होती. मात्र या वेळी या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक स्वंतत्रपणे लढवली होती. निकालानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या तिन्ही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. मात्र मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिल्याचे प्रथामिक निकालातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांकडून आनंद साजरा केला जात आहे. मतदारांनी विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे, असे म्हणत भाजपाकडून विरोधकांवर टीका केली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagaland tripura meghalaya assembly election result bjp trying to get government by alliance prd