नागपूर : भारतीय जनता पक्षातील बंडखोर उमेदवारांनी नेत्यांची झोप उडवली आहे. विशेषत : विदर्भातील बालेकिल्ल्यातील बंडखोरी ही पक्षासाठी घातक ठरणारी असल्याने ती शमवण्यासाठी पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून गुरुवारी फडणवीस यांनी नागपूरमध्ये त्यांच्या देवगिरी या शासकीय निवास्थानी बैठक घेऊन बंडखोरांशी चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भातील ६२ पैकी ३५ मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. लोकसभेप्रमाणेच हे चित्र असून थेट लढतीत भाजप विरोधकांपुढे टिकत नाही, हे आजवर या भागात झालेल्या निवडणुकांवरून दिसून आले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत भाजपने सरकार विरोधी मतांचे कसे विभाजन होईल याबाबत रणनिती आखली. प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) मतांची विभागणी कशी होईल यादृष्टीनेच अपक्षांना रसद पुरवण्यात आली. पण विदर्भातील १२ प्रमुख मतदारसंघात भाजपमध्येच बंडाळी झाली. त्यामुळे मतविभाजनाचा धोका भाजपलाच बसण्याची शक्यता निर्माण झाली.

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यात सूडाच्या राजकारणाचा दुसरा अंक!

बंडाळी झालेल्या काही प्रमुख मतदारसंघापैकी आर्वी हा मतदारसंघ आहे. तेथे फडणवीस यांचे निकटवर्तीय सुमित वानखेडे यांना विद्यमान आमदारांचा विरोध पत्करून उमेदवारी देण्यात आल्याने ते रिगंणात आहेत, अहेरीमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्रम यांच्या विरोधात भाजपचे अम्बरिश राजे आत्राम यांनी बंड केले आहे. एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय गायकवाड यांच्या विरोधात भाजपचे विजयराज शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरांची समजूत घालण्यासाठी भाजपने काही नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. दिवाळीनिमित्त फडणवीस गुरुवारी नागपूरमध्ये दाखल झाले. त्यांनी रात्री विदर्भातील बंडखोरांना देवगिरी या आपल्या शासकीय निवासस्थानी बोलवून घेतले. बहुंताश लोक आले. त्यांच्याशी फडणवीस स्वत: काही लोकांशी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केली. उमेदवारी न देण्यासाठीचे कारणे सांगितली. ज्या जागा मित्रपक्षाला सुटल्या तेथील बंडखोरांनाही राजकीय परिस्थिती व राजकीय अडचण याबाबत अवगत करण्यात आले. जे बंडखोर उमेदवार आले नाही, त्यांच्याशी फडणवीस स्वत: बोलले. रात्री दोन ते अडिच वाजेपर्यंत ही बैठक चालली. दिवाळीचा दिवस असतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते देवगिरीवर हजर होते.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे ‘कुणबी कार्ड’, सहापैकी तीन उमेदवार कुणबी

दरम्यान पश्चिम नागपूरमध्ये भाजपने दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजी होती. विशेषत: या ठिकाणी निवडणूक लढवण्यास फडणवीस यांचे निकटवर्तीय व माजी महापौर संदीप जोशी इच्छुक होते. त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज आहेत, अशी चर्चा सुरू होती. पण त्यांनी एक पत्रकप्रसिद्ध केले असून पश्चिम नागपूरची जागा भाजपच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur assembly constituency maharashtra vidhan sabha election 2024 vidarbha region bjp devendra fadnavis chandrashekhar bawankule print politics news ssb