नागपूर : नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होणारे आणि सलग चार वेळा आमदार असणारे भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे हे मंत्रिपदाचे दावेदार असताना त्यांची विधिमंडळांच्या दोन समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. हा त्यांचा सन्मान आहे की बोळवण अशी चर्चा भाजपमधील निष्ठावानांमध्ये सुरू झाली आहे.
पाच वेळा नगरसेवक , २००९ पासून सलग चार वेळा पूर्व नागपूर मतदारसंघातून घसघशीत मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम, २०१४, २०१९ आणि २०२४ या तीनही लोकसभा निवडणुकीत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पूर्व नागपूरमधून सर्वाधिक मताधिक्य देणारा भाजप आमदार म्हणून ओळख. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक म्हणजे एक लाखाहून अधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळवणारे कृष्णा खोपडे हे खरे तर नागपूरमधून मंत्रिपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार मानले जात होते. पण त्यांना संधी मिळाली नाही. ते कट्टर गडकरी समर्थक आमदार मानले जातात हे येथे उल्लेखनीय.
२०२१४ जेव्हा प्रथमच भाजपच्या नेतृत्वाखाली युतीची सत्ता आली तेव्हा खोपडे मंत्री होतील अशी जोरदार चर्चा नागपुरात होती कारण तेंव्हा तेच वरिष्ठ आमदार होते. एका सार्वजनिक कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णाभाऊंना लवकरच ‘लाल’ दिवा मिळणार असे जाहीरही केले होते. पण तसे झाले नाही. नंतरच्या काळात त्यांना महामंडळाचे अध्यक्ष केले जाईल, अशी चर्चा सुरू झाली, पण२०१४-ते २०१९ या पाच वर्षात त्यांना ना मंत्रिपद मिळाले ना महामंडळाचे अध्यक्षपद, २०१९ ते २०२१ मध्ये राज्यात महायुतीचे सरकार होते. त्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नागपूरमधून सर्वाधिक टीका करणारे आमदार म्हणून खोपडे आघाडीवर होते. त्यानंतर २०२२ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आली. फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. याही वेळी खोपडे यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, असे कार्यकर्त्यांना वाटत होते.. पण त्यांचा अपेक्षा भंग झाला.भाजपने फडणवीस वगळता नागपूरमधून कोणालाच संधी दिली नाही.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची स्थिती डामाडौल होती. केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी होती. अशा परिस्थितीत नागपूरची जागा जिंकणे भाजपसाठी मोठे आव्हान होते. अशा प्रसंगात खोपडे यांच्या पूर्व मतदारसंघातून भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना तब्बल पाऊन लाखाची आघाडी मिळाली. गडकरींच्या विजयात पूर्व नागपूरचे म्हणजे खोपडे यांचे योगदान मोठे ठरले. फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम पेक्षा ही आघाडी अधिक होती हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले तेव्हा् सलग चार वेळा विजयी झालेल्या खोपडेंना मंत्रिपदाची संधी मिळेलच, असा दावा त्यांचे समर्थक करीत होते. पण खोपडेच्या पदरी निराशाच आली. पण त्यांनी कुठल्याही प्रकारची नाराजी व्यक्त केली नाही. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याप्रमाणे त्यांचे काम सुरूच आहे. नागपुरातील सर्वात लोकप्रिय व सर्वसामान्यांच्या संपर्कात असलेला आमदार म्हणून त्यांची आत्ताही ओळख आहे.
विधिमंडळाच्या समित्यांवर वर्णी
आमदार कृष्णा खोपडे यांची विधिमंडळाच्या अंदाज समितीसह दोन समित्यांवर सदस्य म्हणून २६ मार्च २०२५ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे सेनेचे आमदार अर्जून खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. शासकीय निधीतून झालेल्या कामाचे निरीक्षण करण्याचे अधिकार या समितीला असतात. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत संयुक्त समितीमध्ये कृष्णा खोपडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
सन्मान की बोळवण ?
पाच वेळा नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, उपमहापौर, नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष आणि सलग चार वेळा आमदार अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असूनही भाजपने खोपडे यांचा विचार मंत्रिपदासाठी न करता त्यांची विधिंमडळ समितीवर नियुक्ती करणे हा त्यांच्या पक्षातील ज्येष्ठत्वाचा सन्मान आहे की मंत्रीपदाऐवजी त्यांची समितीवर नियुक्ती करून बोळवण करण्यात आली ? अशी चर्चा आहे.