नागपूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे हळूहळू मावळू लागले आहे, तर दुसरीकडे सर्वशक्तीने रिंगणात उतरलेल्या भाजपने प्रत्येक जागा महत्वाची माणून बंडखोरी कशी टाळता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नाराजांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले जात आहे. काँग्रेसमध्ये मात्र श्रेष्ठींच्या आदेशाकडे लक्ष लागले आहे.

उमेदारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातून तीनशेहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वच मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदारांविरुद्ध घटक पक्ष व स्वपक्षीय इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहे. ज्या जागा जिंकू शकू असा विश्वास आहे. या जागांवर भाजपने अधिक लक्ष केंद्रीत करून तेथील नारांजाची समजूत घालण्याचा प्रयत्न मंगळवार सायंकाळपासूनच सुरू केले. महाविकास आघाडीत काँग्रेससह इतर पक्षांकडून मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाही.

हेही वाचा – कोल्हापुरात महायुती, महाविकास आघाडी, तिसऱ्या आघाडीतही बंडखोरीचे ग्रहण

पश्चिम नागपूर हा तसा भाजपचा बालेकिल्ला. २०१९ मध्ये तेथे काँग्रेसने झेंडा फडकावला. हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. मात्र इच्छुकांची संख्या अधिक असल्याने होणारी बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाने दक्षिण नागपूरचे सुधाकर कोहळे यांंना उमेदवारी दिली. त्यांना बाहेरचा उमेदार म्हणून स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी विरोध केला. भाजपचे नरेश बरडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पण मंगळवारी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. कामठीचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज असल्याचे वृत्त झळकले होते. पण ते बावनकुळे यांच्यासोबत अर्ज भरताना होते. यातून त्यांची नाराजी दूर केल्याचा संदेश कार्यकर्त्यांना गेला. उमेदवार महत्वाचा नाही, पक्ष महत्वाचा आहे, असे समजून कामाला लागा, असा संदेश फडणवीस यांनी नाराज कार्यकर्ते व नेत्यांना दिला.

हेही वाचा – बंडखोरीमुळे गडचिरोलीत महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ, गडचिरोलीतील तीन विधानसभेत काँग्रेसकडून ७ तर भाजपचे दोघे अपक्ष लढण्यावर ठाम

काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) या महाविकास आघाडीत असे प्रयत्न सुरू झाल्याचे दोन दिवसांत तरी दिसून आले नाही. उलट बंडाचा झेंडा फडकावणाऱ्याच्या मिरवणुकीत सहभागी होऊन पक्षाच्या नेत्यांनी बंडाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाला. त्याचा चुकीचा संदेश आघाडीच्या इतर घटक पक्षात जाण्याची शक्यता आहे. रामटेक मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटला. तेथे विशाल बरबटे यांनी अर्ज दाखल केला. येथून अपक्ष म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या मिरवणुकीत काँग्रेस नेत्यांचा सहभाग होता. याच मतदारसंघातून केदार याचे समर्थक चंद्रपाल चौकसे यांनीही अर्ज दाखल केला आहे. हिंगणा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रमेश बंग हे अधिकृत उमेदवार आहेत. तेथे याच पक्षाच्या जि.प. सदस्य बोढारे यांनी अर्ज दाखल केला. त्यांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न अजून झाला नाही. पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली तेथे दुनेश्वर पेठे उमेदवार आहेत. तेथे काँग्रेस नेते पुरुषोत्तम हजारे यांनी अर्ज दाखल केला. त्यांनाही पक्षाकडून शांत राहण्याबाबत सूचना देण्यात आली नाही.

सत्ताविरोधी मतविभाजनाचा प्रयत्न महायुतीचा असताना महाविकास आघाडीकडून त्याला खतपणी घालणारीच पावले सध्यातरी उचलली जात असल्याने यंदाची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.