राजेश्वर ठाकरे
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर कधीही आंदोलन न करणारे नागपुरातील काँग्रेसचे नेते व मंत्री पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व नेते राहुल गांधी यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्याने आक्रमक होत रस्त्यावर उतरले. नागपूरच्या समस्यांवर त्यांना आजवर असा संघर्ष का करता आला नाही? असा सवाल आता नागपूरकर करू लागले आहेत.
नागपूरमधील आंदोलनात पक्षाचे मंत्री, बडे नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जी कळकळ या नेत्यांमध्ये पक्षनेतृत्वासाठी दिसून आली, ती जनसामान्यांबाबत कधी दिसून आली नाही. त्यांच्याशी निगडीत मुद्यांवर कधी संघर्ष करताना नेते आजवर दिसले नाहीत. काँग्रेस सत्ताधारी पक्ष असल्याने त्यांना विरोधी पक्षाप्रमाणे रस्त्यावर उतरणे योग्य ठरत नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसजण देतात. पण केंद्रात भाजपची सत्ता आहे, महापालिकेत १५ वर्षांपासून हाच पक्ष सतेत होता. शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नागरिक त्रस्त आहेत, खुद्द पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात पाणीटंचाई आहे. या मुद्यांवरून भाजपला कोंडीत पकडण्यासाठी आंदोलन करण्याची संधी काँग्रेसला होती. पण काँग्रेस नेत्यांनी कधी आंदोलन केले नाही.
राष्ट्रपतीपद निवडणुकीत काँग्रेसचे स्वतःहून एक पाऊल मागे
नागपूर शहराचा विचार करता चोवीस तास पाणीपुरवठा योजना पूर्णपणे फसली. अनधिकृत अभिन्यासाचा प्रश्न आहे तसाच आहे, अतिक्रमणाची समस्या सुटली नाही. सिमेंट रस्ते सोयीचे की गैरसोयीचे असे वाटावे, अशा चुकीच्या पद्धतीने त्याचे बांधकाम करण्यात आले. महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडल्या. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांच्या पाल्यांना खासगी शाळेतील महागडे शिक्षण घ्यावे लागत आहे. जुन्या नागपुरात आरोग्याच्या सुविधांकडे अधिक लक्ष पुरवण्यात आले नाही.
१५ वर्षांत महापालिकेच्या दवाखान्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढली नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. या सर्व समस्या सर्व सामान्यांना भेडसावणाऱ्या आहेत. पण काँग्रेस नेत्यांना कधी त्याआपल्या वाटल्या नाहीत किंवा त्यासाठी आंदोलन करण्याची गरज वाटली नाही. उलट नेते त्यांच्या बंगल्यावरच बसून राहात होते.अपवाद फक्त आमदार विकास टाकरेंचा व काही नगरसेवकांचा होता. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींना खूश करण्यासाठी नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. अशीच तत्परता जनतेच्या प्रश्नावर नेते का दाखवत नाही, अस सवाल केला जात आहे.