चंद्रशेखर बोबडे
आम आदमी पक्षाने (आप) प्रथमच नागपूर महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा निवडणूक रिंगणातील प्रवेश कोणाच्या पथ्यावर व कोणाला फटका देणारा ठरेल याची चर्चा सुरू झाली आहे.
आपने एक वर्षापूर्वीच महापालिका निवडणूक लढणार, अशी घोषणा केली होती. तेव्हापासून ते विविध नागरी प्रश्नावर आंदोलन करून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडेच पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागपूरला भेट दिली. तेव्हापासून पक्षाच्या निवडणुकीतील सहभागावर व त्यामुळे होणाऱ्या राजकीय परिणामांवर चर्चा सुरू झाली.
दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्तास्थापन करणाऱ्या आपच्या निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीवर राजकीय पंडित चर्चा करीत आहेत. त्यांच्या मते सत्ताधारी व प्रमुख विरोधी पक्ष या दोघांवर टीका करायची व त्यांच्यावर नाराज मते पक्षाकडे वळवायची, ही या पक्षाची खेळी आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती, दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष अकाली दल होता. सत्ताधाऱ्यांवर नाराज असणारा मतदार सामान्यपणे दुसऱ्या मोठ्या पक्षाकडे वळतो. पंजाबमध्ये तसे न होता या वर्गाने आपचा पर्याय स्वीकारला. हाच प्रयोग नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत आप करण्याची शक्यता आहे. वर्षभरापासून ते सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष काँग्रेसला लक्ष्य करीत असून तिसरा पर्याय म्हणून प्रतिमा तयार करीत आहे.
विरोधी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीचे नेतृत्व पवार आणि ममतांकडे!
पंधरा वर्षांपासून सत्तेत असल्याने भाजपवर नाराज असलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. त्यावर आपचा डोळा आहे. दुसरीकडे याच मतांवर काँग्रेसचेही लक्ष असले तरी ते त्यांना गृहीत धरून असल्याने त्यांना ऐनवेळी याचा फटका बसू शकतो. दुसरा मोठा पक्ष म्हणून भाजपवर नाराज मते काँग्रेसकडे वळतील, असे या पक्षाच्या नेत्यांना वाटते. भाजपची रणनीती वेगळी आहे. पक्षावर नाराज वर्गाच्या मतांचे जास्तीत जास्त विभाजन कसे करता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. ही काँग्रेसकडे वळली तर त्यांची ताकद वाढून पक्ष पुन्हा सक्रिय होईल व ते राजकीयदृष्ट्या भाजपला परवडणारे नाही. त्यापेक्षा इतरत्र वळणे किंवा आपच्या स्वरूपात नवा पर्याय उभा करणे सोयीचे आहे. त्याअनुषंगाने भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. आपविरुद्ध भाजप नेते थेट टीका करीत नाहीत. हे येथे उल्लेखनीय.
आपच्या एक वर्षातील निवडणूक तयारीचा विचार केला तर भाजपवर नाराज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा कल या पक्षाकडे असल्याचे स्पष्ट होते. सामान्यपणे प्रत्येक निवडणुकीपूर्वी नेते, कार्यकर्त्यांचे पक्षांतर होते व त्याचा कल सत्ताधारी ते विरोधी पक्ष किंवा या उलट असतो. नवीन पक्षाचा पर्याय स्वीकारणारे अपवादात्मक असतात. पण महापालिकेत एकही नगरसेवक नसताना आणि प्रथमच निवडणूक लढत असताना आपमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यात महापालिकेच्या कामकाजावर राग व्यक्त करणारा वर्ग अधिक आहे. हे सहज होत नसल्याचा राजकीय पंडितांचा दावा आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेश सचिव संदेश सिंगलकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लोक आपकडे वळतील अशी प्रतिमा या पक्षाची आता राहिली नाही, पंजाब आणि दिल्लीतील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. आप हा भाजपचाच ‘ब’ चमू आहे, हे लोकांना कळले असल्याने आम्ही आपला दखलपात्र मानत नाही. तर भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास म्हणाले, काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून लोक आपचा पर्याय स्वीकारू शकतात. पण त्याचा भाजपवर काहीही परिमाण होणार नाही.
भाजपशासित सोलापूर, पुणे, पिंपरीतील पाणीप्रश्नावर देवेंद्र फडणवीस जलआक्रोश मोर्चा काढणार का?
आपचे विदर्भ संयोजक व महापालिका निवडणूक प्रभारी देवेंद्र वानखेडे म्हणाले, जिंकणाऱ्याला किंवा त्याला हरवू शकणाऱ्याला म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना नागरिक मते देतात. आम्हाला या दोन क्रमांकावरचा पक्ष व्हायचे आहे. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.