नागपूर : श्रीमंतापासून झोपडपट्टीतील गोरगरीब आणि सर्वसामान्याचा उमेदवार म्हणून ओळख असलेले पूर्व नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी सलग चौथ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवत एक विक्रम केला आहे. लाडकी बहीण योजनेसोबत मतदारसंघात सर्वसामान्य झोपडपट्टीतील लोकांशी असलेली जवळीक आणि विकास कामे खोपडेंच्या मताधिक्यात वाढ करणारे ठरले. त्यांनी १ लाख १४ हजार ७६५ मतांनी विजय मिळवत मतदारसंघावर पकड भक्कम केली.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपुरात २००९ मध्ये कृष्णा खोपडे यांनी या मतदारसंघात भाजपकडून आमदार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर आजपर्यंत ते पराभूत झाले नाही. हा त्यांचा चौथा विजय आहे. या मतदारसंघात यावेळी काँग्रेसचा उमेदवार नव्हता. तेथेच खोपडे यांनी ही अर्धी लढाई जिंकली होती. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मिळाली होती व या पक्षाचे दुनेश्वर पेठे खोपडेंना लढत देऊ शकतील या क्षमतेचे उमेदवारच नव्हते. दुसरीकडे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुरुषोत्तम हजारे यांनी बंडखोरी केली. मात्र त्यांच्याकडे पंजा हे चिन्ह नव्हते. त्यामुळे त्यांची बंडखोरी प्रभावी ठरू शकली नाही हे त्यांना मिळालेल्या मतांवरून स्पष्ट झाले. महायुतीमधून अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी बंडखोरी केली. सुरुवातीला ही बंडखोरी खरी वाटत होती. पण नंतर ही भाजपचीच खेळी होती हे स्पष्ट झाले. कारण खोपडे यांच्याविरुद्ध प्रस्थापिंताविंरुद्ध असणारी नाराजी होतीच. ती पक्षातून जशी होती तशीच ती मतदारांमध्येही होती. या भागातील हिंदी भाषिक मतदारांचा, व्यावसायिकांचा यात अधिक समावेश होता. ही मते विरोधकांकडे जाऊ नये यासाठी पांडेंच्या माध्यमातून तजवीज भाजपनेच केली असे बोलले जाते. मतदारसंघातील ६० टक्के महिलांना राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळवून देण्यात खोपडेंचे योगदान होते. त्याचा फायदा त्यांना ही निवडणूक जिंकताना झाला. शिवाय मतदारसंघात गेल्या १५ वर्षांत करण्यात आलेल्या विकासकामाना प्राधान्य आणि सर्वसामान्य मतदाराच्या वैयक्तिक कामाकडे त्यांनी लक्ष दिले. त्याचा परिणाम म्हणून खोपडे यांच्या पारड्यात सामान्य लोकांची मते पडली आहे.
हेही वाचा – दांडगा जनसंपर्क, संघटन कौशल्यावर ठाकरेंनी गड राखला – पश्चिम नागपूर मतदारसंघ
हेही वाचा – उत्तर महाराष्ट्रातील मविआच्या एकमेव विजयाने शिरीष नाईक चर्चेत
आभा पांडे यांना दहा हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ७९ हजार ९७५ मते घेऊन खोपडेना चांगलीच लढत देणारे पुरुषोत्तम हजारे यांना ११ हजार ३२७ मते पडली आहे. गेल्या काही वर्षात पूर्व नागपूर मतदारसंघ काँग्रेसकडे असताना यावेळी महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यामुळे ईव्हीएम मशीनमधून पंजा गायब होऊन त्या ठिकाणी तुतारी चिन्ह होते. त्यामुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला कामगार यावेळी महाविकास आघाडीकडे गेला नाही. २०१९ च्या निवडणुकीत १,०३,९९२ मते घेणारे खोपडे यांनी मात्र यावेळी १ लाख १४ हजार मतांची आघाडी घेत लक्षाधीश जनतेचा प्रतिनिधी असल्याचे सिद्ध केले.