देवेश गोंडाणे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्यापरिषदेवर २५ वर्षांपासून वर्चस्व गाजवणारे काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार ॲड. अभिजीत वंजारी आणि माजी प्राचार्य व ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना भाजप परिवारातील शिक्षण मंचाने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये धोबीपछाड दिली. विशेष म्हणजे दोन्ही प्राधिकरणांत महाविद्यालयांचे संस्थाचालक, तेथील शिक्षक आणि प्राचार्य मतदार आहेत. त्यातच, सर्वाधिक महाविद्यालये ही काँग्रेस नेत्यांची असतानाही त्यांना अपेक्षित यश न मिळवता आल्याने काँग्रेसमधील घरचा भेदी कोण? असा प्रश्न समोर येत आहे.
विद्यापीठ कायदा २०१६ नंतर अधिसभा आणि विद्यापरिषदेमध्ये राज्यपाल आणि कुलगुरूंकडून होणाऱ्या नामनिर्देशित सदस्यांची संख्या वाढली. कायदा लागू झाल्यावर केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार होते. परिणामी नामनिर्देशित सदस्यांच्या जोरावर विद्यापीठांमध्ये भाजप परिवारातील शिक्षण मंचची ताकद वाढली. असे असले तरी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये डॉ. तायवाडे यांच्या यंग टीचर्स असोसिएशन आणि ॲड. अभिजीत वंजारी यांच्या सेक्युलर पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. यंदा या दोन्ही संघटना एकत्र आल्या. त्यांना जोड मिळाली ती आंबेडकर टीचर्स असोसिएशन आणि युवा सेनेची. शिक्षण मंचाच्या विरोधात महाआघाडी तयार झाली. त्यामुळे त्यांना यंदा अधिक जागांवर विजय मिळवता येईल, अशी अपेक्षा विद्यापीठ वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र, निवडणुकीचे निकाल या अपेक्षांना छेद देणारे ठरले. महाआघाडीला चांगलाच फटका बसला. यामागच्या कारणांवरून सध्या चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. मतांचे नियोजन करताना महाआघाडीच्या नेत्यांनी संपूर्ण आघाडीचा विचार केला की फक्त आपल्याच आप्तस्वकीयांच्या विजयाची तजविज केली, अशी शंका आघाडीच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांना मिळालेल्या मतसंख्येवरून निर्माण झाली आहे.
हेही वाचा: Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
विद्यापीठाशी संलग्नित ९० टक्के महाविद्यालये ही काँग्रेस नेत्यांची आहेत. यातील व्यस्थापन प्रतिनिधींच्या मतांची संख्या २१२ आहे. निवडणूक रिंगणातील ॲड. अभिजित वंजारी यांच्या पत्नी स्मिता वंजारी यांना महिला गटातून सर्वाधिक १४० मते मिळाली तर खुल्या गटातून तायवाडे यांनी ५२ मते घेत विजय मिळवला. मात्र, अन्य तीन जागांवर महाआघाडीचे उमेदवार पराभूत झाले. शिक्षण मंचाने या जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे तायवाडे आणि वंजारी यांना मिळणारी मते आघाडीच्या अन्य उमेदवारांना का मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्राचार्य प्रवर्गामध्येही महिला गटातून तायवाडे यांच्या पत्नी डॉ. शरयू तायवाडे पहिल्याच फेरीत विजयी झाल्या. मात्र, अन्य जागांवर आघाडीला अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे महाआघाडीच्या नेत्यांनी केवळ कुटुंबातील उमेदवारांसाठीच प्रयत्न केले का?, अन्य उमेदवारांना मतदान न देणारा काँग्रेसमधील घरभेदी कोण? असे प्रश्न त्यांच्याच संघटनेतून उपस्थित केले जात आहेत.
कर्मचाऱ्यांवरील काँग्रेसची पकड सुटली
नागपूर ग्रामीण काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या एका बड्या नेत्याने यंदा शिक्षण मंचाला मदत केल्याची चर्चा आहे. त्यांच्या संस्थेच्या अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. तेथील मतांची संख्याही अधिक आहे. त्यांनी मंचाला मदत केल्यानेही महाआघाडीला फटका बसल्याची चर्चा आहे. याशिवाय शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची सत्ता आहे. मात्र, संस्थेच्या धनवटे महाविद्यालयाचे डॉ. जयवंत वडते आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. महेंद्र ढोरे शिक्षण मंचाकडून उमेदवारी मिळवून विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षण मंचाने घुसखोरी केली हे स्पष्ट होते.
एकूणच विद्यापीठ हे राजकारणापासून दूर असावे, असे कायम सांगितले जाते. मात्र यातील निवडणुका या राजकारणात सक्रिय असणारे नेतेच लढवत असल्याने त्याला अन्य निवडणुकांप्रमाणेच स्वरूप येते. राजकारणात प्रत्येक पक्षात कोणीतरी घरभेदी असतो. विद्यापीठात काँग्रेसला अशाच घरभेद्याचा फटका बसला हे निवडणूक निकालावरून दिसून येते.