तमिळनाडू भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून ६४ वर्षीय नैनर नागेंद्रन यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ च्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-अण्णाद्रमुक युतीचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अण्णाद्रमुकचे प्रमुख एडाप्पडी के. पलानस्वामी यांची युतीचे नेते म्हणून नियुक्ती केली गेल्यानंतर एका दिवसात नागेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली. के. अन्नामलाई यांच्या जागी नागेंद्रन हे आता तमिळनाडू भाजपा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. अन्नामलाई हे पक्षाचे एक तडफदार नेतृत्व मानले जाते. त्यांनी अगदी मर्यादित उपस्थिती असलेल्या राज्यातही पक्षाचे लक्ष वेधले.

अन्नामलाई यांचा राजीनामा ही एक रणनीती?

भाजपाने राज्यात पक्षाच्या नेतृत्वाची पुनर्रचना करण्यासाठी, तसेच अण्णाद्रमुकसोबतच्या युतीच्या पार्श्वभूमीवर एक रणनीतीचा भाग म्हणून अन्नामलाई यांचा राजीनामा स्वीकारला आहे. चेन्नई येथे राज्यातील भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत नागेंद्रन यांनी बोलताना पक्षाच्या अनेक नेत्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, “२०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व अण्णाद्रमुकचे के. पलानस्वामी करतील,” अशी माहितीही गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

“पोन राधाकृष्णन, एच. राजा, तमिलीसाई सौंदरराजन, सी. पी. राधाकृष्णन या सर्वांनी पक्षाची एकेक वीट रचली आहे. एल. मुरुगन यांनी त्यांच्या वेल यात्रेने पक्षाचा आणखी विस्तार केला. पक्षाच्या महिला शाखेच्या नेतृत्व करणाऱ्या वनती श्रीनिवासन यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पक्षाला बळकटी दिली. एल. गणेशन यांनी पक्षाचा महत्त्वाचा भाग उभारला. मात्र, अन्नामलाई यांनी त्यांच्या एन मन्न, एन मक्कल यात्रेद्वारे केवळ विस्तारच केला नाही तर कळसही उभारला”, असे यावेळी नागेंद्रन यांनी म्हटले.

“मला देण्यात आलेले काम म्हणजे २०२६ मध्ये या पक्षाचा कुंभअभिषेकम करणे हेच आहे. जेव्हा वेळ काही घडवू शकत नाही, तेव्हा तारे घडवतात. आणि आता तारे एका रांगेत उतरत आहेत”, असेही नागेंद्रन म्हणाले. नागेंद्रन यांनी पक्षाचे तमिळनाडू प्रभारी व राष्ट्रीय सचिव अरविंद मेनन यांना इशारा करीत म्हटले, “ते केरळमध्ये जन्मले होते आणि इथे हिंदीत बोलतात. जर ते मल्याळममध्ये बोलले असते, तर इथल्या लोकांनी त्यांना आणखी योग्यरीत्या समजून घेतले असते. मी त्यांना पुढच्या वेळी मल्याळममध्ये बोलण्याची विनंती करतो”, असे म्हटल्यावर एकच हशा पिकला.

नागेंद्रन यांच्या मोठी जबाबदारी

तमिळनाडू भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून ६४ वर्षीय नैनर नागेंद्रन यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ च्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-अण्णाद्रमुक युतीचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अण्णाद्रमुकचे प्रमुख एडाप्पडी के. पलानस्वामी यांची युतीचे नेते म्हणून नियुक्ती केली गेल्यानंतर एका दिवसात नागेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली. के. अन्नामलाई यांच्या जागी नागेंद्रन हे आता तमिळनाडू भाजपा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. अन्नामलाई हे पक्षाचे एक तडफदार नेतृत्व मानले जाते. त्यांनी अगदी मर्यादित उपस्थिती असलेल्या राज्यातही पक्षाचे लक्ष वेधले. भाजपाने राज्यात पक्षाच्या नेतृत्वाची पुनर्रचना करण्यासाठी, तसेच अण्णाद्रमुकसोबतच्या युतीच्या पार्श्वभूमीवर एक रणनीतीचा भाग म्हणून अन्नामलाई यांचा राजीनामा स्वीकारला आहे. चेन्नई येथे राज्यातील भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत नागेंद्रन यांनी बोलताना पक्षाच्या अनेक नेत्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, “२०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व अण्णाद्रमुकचे के. पलानस्वामी करतील,” अशी माहितीही गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

राजकीय प्रवासाचा विचार करताना नागेंद्रन यांनी काही आठवणींना उजाळा दिला. भाजपाचे ज्येष्ठ नेते पोन राधाकृष्णन आठ वर्षांपूर्वी अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांना दिल्लीला कसे घेऊन गेले होते याबाबत ते बोलले. “पक्षात सामील झाल्यानंतर माझ्या काही तक्रारी होत्या. अण्णाद्रमुकमध्ये वरिष्ठ नेता असताना इकडे मला मोठं पद देऊ केलं गेलं नाही. मात्र, संघाबाबत जाणून घेतल्यानंतर माझा गैरसमज दूर झाला. संघ संस्थापक के. बी. हेडगेवार यांचेही आभार मानतो की, त्यांनी मला या मार्गावर आणले”, असे यावेळी नागेंद्रन यांनी सांगितले. अन्नामलाई यांच्या तुलनेत मी फक्त एक वाऱ्याची झुळूक असू शकतो; मात्र ते वादळ आहेत. मी ही जबाबदारी स्वीकारली तरी माझ्यासाठी हे एक आव्हानच आहे. कारण- अन्नामलाई यांनी काही रूपरेषा निश्चित केल्या आहेत, त्यानुसार काम करावे लागेल”, असं मत नागेंद्रन यांनी व्यक्त केलं. यावेळी अन्नामलाई यांना चप्पल घालण्याची विनंती नागेंद्रन यांनी केली. सरकार बदलल्यानंतरच चप्पल घालणार, असा पण अन्नामलाई यांनी याआधी केला होता. तेव्हा नागेंद्रन यांनी त्यांना चप्पल घालण्याची विनंती केली. ते म्हणाले, “अमित शाह यांनी एनडीए सरकारचा पाया आधीच रचला आहे. तेव्हा आता वेळ आली आहे आणि तारेही जुळले आहेत.”

अन्नामलाई, एल. मुरुगन, पोन राधाकृष्णन, एच. राजा, वनथी श्रीनिवासन आणि इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नागेंद्रन यांच्या नामांकनाला पाठिंबा दिला. २००१ ते २००६ पर्यंत जयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक सरकारमध्ये माजी मंत्री असलेले नागेंद्रन २०१७ मध्ये भाजपामध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व विधानसभेत विधिमंडळ नेते म्हणून काम पाहिले. अन्नामलाई आणि ईपीएस हे दोघेही गौंडर समुदायाचे आहेत. अन्नामलाई यांनी राजीनामा देणे हा तमिळनाडूमधील जातीय समीकरणांचे संतुलन पुन्हा बसवण्याच्या पक्षाच्या धोरणाचा एक भाग होता. नागेंद्रन हे राज्याच्या दक्षिणेकडील तिरुनेलवेल्ली इथल्या एका प्रमुख थेवर समुदायाचे नेते आहेत. भाजपाच्या नेतृत्वाशी त्यांची जवळीक आहे.

नागेंद्रन यांनी २०२१ मध्ये भाजपा-अण्णाद्रमुक युतीचा भाग म्हणून तिरुनेलवेल्ली येथून विधानसभा निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचा विजय झाला. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते अपयशी ठरले. २०२१ मध्ये शाह यांनी वैयक्तिकरीत्या नागेंद्रन यांचा प्रचार केला होता. २०२४ च्या लोकसभा मोहिमेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नागेंद्रन यांच्या दोन जाहीर सभांना उपस्थित राहिले होते. तमिळनाडू भाजपामधील चार आमदारांपैकी नागेंद्रन हे सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची आधीपासून संघर्षरहित सार्वजनिक प्रतिमा आहे. नागेंद्रन हेअन्नामलाई यांच्या अगदी विरुद्ध आहेत. अन्नामलाई यांच्या आक्रमक राजकारणामुळे भाजपाची दृश्यमानता मोठ्या प्रमाणात सुधारली. भाजपामध्ये सामील झाल्यानंतर नागेंद्रन यांनी २०२१ ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यांच्या प्रदेशातील अल्पसंख्याक समुदायांमध्ये नागेंद्रन यांची प्रतिमा आणि आदर यांमुळे त्यांना या निवडणुकीत यश मिळवता आले.