Nalasopara Vidhan Sabha Election 2024 : नालासोपारा विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे अस्तित्व नसतानाही कॉंग्रेसने ही जागा घेऊन संदीप पांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे खुद्द कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरली आहे. शिवेसना ठाकरे गटाने या उमदेवारीमुळे अपक्ष उमेदवार धनंजय गावडे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पांडे यांच्या उमेदवारीमुळे उत्तर भारतीयांच्या मतांचे विभाजन होणार आहे. या सर्व बाबी बहुजन विकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहेत.

नालासोपारा हा पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असून त्यात सुमारे ६ लाख मतदार आहेत. या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर हे विद्यमान आमदार असून सलग तीन वेळा त्यांनी येथून निवडणूक जिंकली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या वाढत असल्याने भाजपासाठी हा सुरक्षित मतदार मानला जातो. लोकसभा निवडणुकीत भाजपाला बविआपेक्षा ७१ हजारांहून अधिक मते मिळाली होती. भाजपाने यंदा राजन नाईक यांना उमेदवारी दिली आहे तर बहुजन विकास आघाडीतर्फे आमदार क्षितीज ठाकूर चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षात तुल्यबळ लढत अपेक्षित होती.

हेही वाचा – बेकायदेशीर फटाके विक्रेत्यांवर पालिकेची अनोखी कारवाई

महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेची (ठाकरे गट) या मतदारसंघात निर्णायक मते आहेत. पण ही जागा वाटपात कॉंग्रेसच्या वाट्याला गेली. कॉंग्रसकडे स्थानिक सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे आगरी सेनेचे कैलास पाटील तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी उमेदवारी मिळविण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. पंरतु कॉंग्रेसने अचानक रविवारी संध्याकाळी संदीप पांडे यांची उमेदवारी घोषित केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. पांडे यांच्या उमेदवारीमुळे खुद्द कॉंग्रेसमध्येही नाराजी पसरली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एकेकाळचे सहाय्यक अशी त्यांची ओळख. ते मतदारसंघाच्या बाहेरील असल्याने त्यांना कुणी ओळखत नाही. अशा अनोळखी उमेदवाराला कॉंग्रेसने तिकीट का दिले असा सवाल कार्यकर्त्यांनी केला असून मोठी नाराजी पसरली आहे. शिवसेना ठाकरे गट देखील अशा उमेदवाराचा प्रचार करण्यास तयार नाही.

हेही वाचा – वसई: दिवाळीच्या तोंडावर पोलीस अधिकारी अस्वस्थ; आयुक्तालयातील ४० पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार

संदीप पांडे यांचा उमेदवारीचा फायदा अप्रत्यक्षपणे बहुजन विकास आघाडीला होणार असल्याचे सांगितले जात आहे. पांडे हे उत्तरभारतीय असल्याने भाजपाच्या पारंपरिक मतांचे विभाजन होणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक यांनी प्रहार पक्षातर्फे निवडणूक अर्ज भरण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गावडे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच गावडे यांनी आपल्या स्वराज अभियान या संघटनेची मोट बांधताना शिवसैनिक आपल्याकडे वळवले होते. आता पांडे यांच्या उमेदवारीने शिवसैनिक उघडपणे त्यांना पाठिंबा देऊ लागले आहे. दुसरीकडे प्रतिस्पर्धी भाजप कमजोर होऊ लागल्याने बविआ कार्यकर्ते मात्र आनंदात आहे. राजीव पाटील यांचे बंड शमल्यानंतर बविआचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. पांडे यांच्या मतांमुळे उत्तरभारतीय मतांचे विभाजन, महाविकास आघाडीची मते धनंजय गावडे यांच्याकडे वळण्याची शक्यता पाहता भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संदीप पांडे यांची उमेदवारी बविआच्या पथ्यावर पडणार असल्याची राजकीय विश्लेषकांचे मत आहे.