मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत २० जणांनी मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यातील सात जणांना एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रीपद शरद पवारांनी भूषविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पहिल्यांदा २०१४ ते २०१९ या काळात पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले होते. २०१९ मध्ये गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस यांनी अवघ्या साडे तीन दिवसानंरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तिसऱ्या खेपेला त्यांचा गुरुवारी शपथविधी पार पडत आहे.

राज्याच्या इतिहासात वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस या दोनच मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा सलग कालावधी पूर्ण केला. उर्वरित १८ जणांना पाच वर्षांचा सलग कालावधी मिळालेला नाही.

हे ही वाचा… Maharashtra Government Formation Live Updates : “मी महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो”, देवेंद्र फडणवीसांचं विधानभवनात भाषण!

वसंतराव नाईक यांनी १९६३ ते १९७५ असे सर्वाधिक ११ वर्षांपेक्षा अधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविले. शरद पवार यांनी सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी त्यांचा पूर्ण कालावधी हा साडेपाच वर्षांचा आहे. सर्वात कमी साडे तीन दिवस मुख्यमंत्रीपद हे फडणवीस यांनी भूषविले आहे.

एकापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे नेते :

शरद पवार (४ वेळा़)

वसंतराव नाईक ( ३ वेळा)

वसंतदादा पाटील (३ वेळा)

शकंरराव चव्हाण (२ वेळा)

अशोक चव्हाण (२ वेळा)

विलासराव देशमुख (२ वेळा)

देवेंद्र फडणवीस (आता तिसऱ्यांदा)


एक वेळेला मुख्यमंत्रीपद भूषविलेले नेते :

यशवंतराव चव्हाण

मारोतराव कन्नमवार

पी. के. सावंत

बॅ. ए. आर. अंतुले

बाबासाहेब भोसले

शिवाजीराव निलंगेकर पाटील

सुधाकरराव नाईक

मनोहर जोशी.

नारायण राणे

सुशीलकुमार शिंदे

पृथ्वीराज चव्हाण

उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे

हे ही वाचा… धुसफूस सुरूच; शपथविधीबाबत बावनकुळेंच्या घोषणेवर शिंदे गटातून नाराजीचा सूर

उपमुख्यमंत्रीपदावरून बढती मिळणारे फडणवीस पहिलेच मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या नेत्यांना कधीच आतापर्यंत मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली नव्हती. ही प्रथा फडणवीस यांनी मोडीत काढली आहे. मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्रीपद भूषविणारे फडणवीस हे जसे पहिलेच तसेच उपमुख्यमंत्रीपदावरून मुख्यमंत्रीपद भूषविण्याच संधी मिळणारे पहिलेच ठरले आहेत. आतापर्यंत नासिकराव तिरपुडे, सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील, देवेंद्र फडणवी, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. यापैकी फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Names of chief ministers who held the post more than once in the history of the maharashtra state print politics news asj