सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : औरंगाबादचे शहराचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यास मान्यता देत शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतपेढीस तर तर नवी मुंबईतील विमानतळाचे नामकरण लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देत मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या आगरी-कोळी समाजातील मतपेढी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला ३० जूनला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. तर तिकडे सर्वोच्च न्यायालयात त्यावरून शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. अशा अस्थिर राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले नामांतराचे नामकरणाचे निर्णय घेत ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाशी आणि शिवसेनेच्या पाठिराख्या आगरी-कोळी समाजाच्या भावनांशी बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने यापूर्वीच केला. पण केंद्र सरकारने त्यास अजूनही मंजुरी दिलेली नाही. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला हिंदुत्ववादी प्रतिमेसाठी नामांतराचा विषय महत्त्वाचा झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला आणि तो मंजूरही झाला. आता हा प्रस्ताव नियमाप्रमाणे पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून करण्यात येईल.

नवी मुंबईतील नियोजित विमानतळाचे नामकरण लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे विमानतळ जाहीर झाल्यानंतर त्यास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली होती. मात्र या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२० मध्ये सिडकोमार्फत केला. त्यामुळे स्थानिक आगरी-कोळी समाजात असंतोष निर्माण झाला. ठाणे, रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आगरी-कोळी समाजाचे मोर्चे निघाले आणि दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी झाली. मुंबई महानगर प्रदेशात आगरी-कोळी समाज हा शिवसेनेचा पाठिराखा आहे व मोठी मतपेढी आहे. नामकरण वादातून ती शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मागण्यांसाठी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे योगदान व विविध संघटनांची मागणी विचारात घेता या विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कॉंग्रेसचीही नामांतराची मागणी

मंत्रिमंडळ बैठकीतील नामांतरांचे ठराव मंजूर केल्यानंतर कॉंग्रेसच्या मंत्र्यांनीही नामांतर व नामकरणाच्या मागण्या केल्या. पुण्याचे नामांतर जिजाऊनगर असे करावे तर शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे नामकरण बॅरिस्टर ए. आर. अंतुले असे करावे अशी मागणी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी केली.

Story img Loader