नागपूर शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्ष पातळीवर होण्यापूर्वीच माजी मंत्री सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा दिल्याने विदर्भातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कोंडी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नागपूर : अविवाहित असल्याचे सांगून युवतीशी विवाह, जीम ट्रेनरवर बलात्काराचा गुन्हा

नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीत जागा वाटपाचे सूत्र बदलण्यात आले. नाशिकची जागा शिवसेना ठाकरे गट आणि त्याबदल्यात नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळाली. तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ निघून गेली. त्यामुळे काँग्रेसला समविचारी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, कोणाला समर्थन द्यायचे यावरून स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाली. काही नेते विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांच्या बाजूने तर काही नेते शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना अनुकूल होते. त्यानंतर अडबाले यांना पाठिंबा देण्याचे ठरले. परंतु प्रदेशाध्यक्षांनी उमेदवाराबाबत एक-दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान वेळ लांबत गेल्यामुळे केदार आणि वडेट्टीवार या दोन माजी मंत्र्यांनी परस्पर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला. आता एकदा पाठिंबा घोषित केल्यामुळे नाना पटोले यांच्या पक्षांतर्गतविरोधांना संधी मिळाली. तिकडे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र झाडे यांनी पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस नेते दोन वेगवेगळ्या उमेदवाराला पाठिंबा घोषित करीत असल्याने पक्षाची प्रतिमा डागाळलीच, शिवाय प्रदेशाध्यक्ष म्हणून नियंत्रण नसल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडीमुळे नाना पटोले यांची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले.

हेही वाचा- नागपूर : ‘एसटी’तीलही अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांनाही लाभ, महामंडळाकडून अखेर आदेश निघाले

यासंदर्भात माजी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, माजी मंत्री सुनील केदार त्यांच्या निवासस्थानी भेटायला आले. त्यावेळी शिक्षक मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायची चर्चा झाली. उमेदवारीबाबत पक्षात एकमत आहे. अडबाले यांच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रीय अध्यक्षाच्या मान्यतेसाठी गेला आहे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole is becoming trouble due to two former congress ministers print politics news dpj