नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्व इच्छुकांना दीर्घ प्रतीक्षा करायला लावल्यानंतर भाजपने सोमवारी दुपारी पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक मारोतराव हंबर्डे यांचे नाव जाहीर केले. ते आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची घोषणा करतानाच नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूकही जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र यांचे नाव दोन आठवड्यांपूर्वी निश्चित करून जाहीर केले होते. सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीची सभा नांदेडमध्ये सुरू असतानाच दिल्लीहून भाजपच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर डॉ. संतुक हंबर्डे यांच्या समर्थकांनी वजिराबाद भागातील पक्ष कार्यालयासमोर मोठा जल्लोष केला.
या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडे डॉ. हंबर्डे यांच्यासह माजी आमदार व जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनीही उमेदवारीवर दावा केला होता. पक्षनेते, खासदार अशोक चव्हाण यांनी पक्षसंघटनेतील या दोन नावांना प्राधान्य न देता पक्षात नव्यानेच आलेले साखर कारखानदार मारोतराव कवळे यांचे नाव पुढे केल्यामुळे चुरस वाढली होती.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार निश्चित करताना पक्ष संघटनेतील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा विचार झाला, ही बाब अत्यंत स्वागतार्ह व आनंददायी आहे. पक्षाने दिलेल्या या संधीचे विजयात रूपांतर करणे हे आपले आता ध्येय आहे. मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाच्या सर्व नेत्यांचा आभारी आहे. त्यांच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही.
डॉ. संतुक हंबर्डे, भाजपा उमेदवार
भोसीकर यांना ‘वंचित’ची उमेदवारी
मुंबई : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (वंचित) अविनाश विश्वासराव भोसीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नांदेडमध्ये ‘वंचित’चे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पोटनिवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. नांदेडच्या पोटनिवडणुकीत ‘एमआयएम’ने उडी घेतली आहे. ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलील येथून लढण्याची शक्यता आहे. मात्र जलील यांनी आपली उमेदवारी गुलदस्त्यात ठेवली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’चे उमेदवार यशपाल भिंगे यांनी या मतदारसंघात १ लाख ६६ हजार मते घेतली होती. या मतदारसंघात १९ टक्के अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे.