सोलापूर : संघटित आणि असंघटित कामगारांसाठी पाच दशके संघर्षात्मक आणि रचनात्मक लढाई केलेले माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. आडम यांनी नुकतीच सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आडम यांनी महाविकास आघाडीकडे ही जागा मागितली. परंतु येथे काँग्रेसला उमेदवारी मिळाली. त्यामुळे काँग्रेस आणि आडम मास्तर यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद झाला होता. यातून त्यांच्या घरावर दगडफेकीचा प्रकारही झाला.
सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या चौरंगी लढतीत भाजपचे देवेंद्र कोठे हे सर्वाधिक ५४.८६ टक्के मते घेऊन निवडून आले असून, आडम यांना केवळ ३.३९ टक्के मते मिळाली आहेत. यामुळे ते निराश झाले आहेत. आडम यांचे वडील नारायणराव आडम हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांच्याच देखरेखीखाली आडम हे घडले. १९७४ मध्ये सोलापूर महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर ते प्रकाशात आले. १९७८ मध्ये सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते सर्वप्रथम निवडून आले.