अयोध्येतील राम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भाजपासाठी राम मंदिर हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील अयोध्येला वेळोवेळी भेट दिलेली आहे. शनिवारी (३० डिसेंबर) अयोध्येतील विमानतळासह अन्य पायाभूत सविधांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमालाही नरेंद्र मोदी उपस्थित होते.
२०१९ सालापासून अनेकवेळा अयोध्या दौरा
मे २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून नरेंद्र मोदी यांची शनिवारची ही चौथी अयोध्या भेट आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी अयोध्या जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यानंतर राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यालादेखील ते २०२० साली अयोध्येत गेले होते. २०२२ साली आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवालाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते अयोध्येतील विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी अयोध्येत आले.
…तर मोदी ठरणार पहिले पंतप्रधान
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमालाही मोदी पंतप्रधान म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर मोदी यांनी पंतप्रधान म्हणून २०१४ पासून अयोध्येला एकूण पाच वेळा भेट दिलेली असेल. म्हणजेच ते अयोध्येला सर्वाधिकवेळा भेट देणारे देशाचे पंतप्रधान ठरू शकतात.
२०१४ सालच्या निवडणुकीत अयोध्येत सभा
पंतप्रधान होण्याआधीही नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत अनेक सभा घेतल्या. २००९ सालीही त्यांनी अशाच एका सभेला संबोधित केले होते. त्यानंतर २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी अयोध्या येथे सभा घेतली होती. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांनी भाजपाच्या सभेला संबोधित केले होते.
मोदींनी दिले महात्मा गांधींचे उदाहरण
५ मे २०१४ रोजी त्यांनी फैजाबाद येथील भारत विजय यात्रेला संबोधित केले होते. यावेळी बोलताना त्यांनी महात्मा गांधी यांचा संदर्भ देत रामराज्याचा उल्लेख केला होता. “देशात कशा प्रकारचे राज्य हवे, हे जेव्हा महात्मा गांधी यांना विचारले जाई, तेव्हा ते एका वाक्यात समजून सांगायचे. जेव्हा तुम्ही कल्याणकारी राज्याचा विचार करता, तेव्हा ते रामराज्याप्रमाणे असायला हवे, असे गांधी सांगायचे. रामराज्यात सगळे आनंदी होते. एकही व्यक्ती दु:खी नव्हती,” असे मोदी म्हणाले होते.
“राम भारतीयत्वाच्या भावनेला मूर्त रुप देतात”
दीपोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी २३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रभू रामाचा उल्लेख केला होता. “प्रभू राम हे भारतीयत्वाच्या भावनेला मूर्त रुप देतात. आपण आपल्या कर्तव्याप्रती कटिबद्ध असायला हवे. आपल्या संविधानच्या मूळ प्रतीवर प्रभू राम, लक्ष्मण आणि सीतामाता आहे. त्याच पानावर मूलभूत हक्कांबद्दल सांगण्यात आलेले आहे. एका बाजूला आपल्या संवैधानिक अधिकारांची हमी आहे, तर दुसरीकडे रामाच्या रुपात सांस्कृतिक कर्तव्याची जाणीव करून देण्यात येते. म्हणजेच आपण आपल्या कर्तव्याप्रती जेवढे दृढ होऊ तेवढेच रामराज्य प्रत्यक्षात येईल”, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते.