हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्या वेगवेगळ्या उद्योगांतील गुंतवणूक कमी झाली आहे. त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे. अदाणी यांनी स्टॉकमध्ये फेरफार तसेच गैरव्यवस्थापन, अनियमितता केल्याचा आरोप हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्यात जवळचे संबंध आहेत, गौतम अदाणी यांनी भाजपाला पैसे दिलेले आहेत, असा आरोप काँग्रसने केला आहे. यावरच आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणार का? प्रश्न विचारताच चंद्रकांत खैरे भडकले; रागात म्हणाले “हट्, ज्यांनी…”
अदाणी हे मोदींच्या जवळचे आहेत, असेच प्रत्येकाला वाटते
मागील काही दिवसांपासून विरोधक मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. मोदी आणि अदाणी यांच्यात जवळचे संबंध असून त्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावर महुआ मोईत्रा यांनी आपली भूमिका मांडली आहे. “या सर्व प्रकरणात मोदी यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, असे मी कधीच म्हटलेलं नाही. मात्र मोदी यांना अदाणी यांच्याकडून फसवले जात आहे. अदाणी मोदी यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी फिरत आहेत. अदाणी हे मोदींच्या जवळचे आहेत, असेच प्रत्येकाला वाटते. मात्र मोदी आणि अदाणी यांच्यात जवळचे संबंध नसतील तर तसे त्यांनी स्पष्ट करावे. माझ्यासोबत अदाणी यांनी प्रवास केलेला नाही, असे मोदी यांनी सांगावे. त्यांनी सेबीला अदाणींच्या उद्योग समूहांच्या चौकशीचे आदेश द्यावेत. न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास व्हावा,” अशी भूमिका मोईत्रा यांनी मांडली.
हेही वाचा >>> “…तर तुमच्या मफलरचीही ‘जेपीसी’ चौकशी करावी लागेल”, भाजपाचं मल्लिकार्जुन खरगेंना प्रत्युत्तर
धमरा बंदर अदाणी यांच्याकडे का सोपवण्यात आले?
“माझा मोदी यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. अदाणी यांना एखादे कंत्राट निविदा पद्धतीने मिळालेले असेल तर काहीही अडचण नाही. मात्र कोणतीही निविदा न काढता धमरा बंदर अदाणी यांच्याकडे का सोपवण्यात आले. निविदेद्वारे नव्हे तर व्यवासायिक वाटाघाटी करून हा निर्णय घेण्यात आला असे मला सांगण्यात आले,” अशी माहिती मोईत्रा यांनी दिली.
दरम्यान, हिंडेनबर्गचा रिपोर्ट आणि मोदी-अदाणी यांच्यातील संबंध या मुद्द्यावरून संसदेतील आजचा दिवसही वादळी ठरला. मोदी भाषणासाठी उभे राहताच विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण करत ‘मोदी-अदाणी भाई भाई’ अशा घोषणा दिल्या. तसेच याबाबत चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी अशी मागणीही करण्यात आली.