मोदी सरकारने ‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी’चे (एनएमएमएल) नाव बदलून ‘प्राइम मिनिस्टर्स म्युझियम ॲण्ड लायब्ररी’ असे केले आहे. या निर्णयामुळे काँग्रेसकडून मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. सुडाच्या, द्वेषाच्या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांची मोदी यांच्यावर टीका
शुक्रवारी काँग्रेसने मोदी सरकारवर सडकून टीका केली. एनएमएमएलचे नाव बदलणे हे क्षुद्र कृत्य आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. “ज्यांना स्वत:चा इतिहास नाही, असे लोक लोकांचा इतिहास पुसायला निघाले आहेत. एनएमएमएलचे नाव बदलण्याच्या तुच्छ प्रयत्नामुळे पंडित नेहरू यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व कमी होणार नाही. पंडित नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि लोकशाहीचे संरक्षक होते. या कृत्यातून भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानसिकता दिसून येते. मोदी सरकारच्या या छोट्या विचारांमुळे पंडित नेहरूंसारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचे देशाच्या जडणघडणीतील योगदान कमी होणार नाही,” असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत.
हेही वाचा >> मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्ये काबीज करण्यासाठी भाजपाचा ‘मेगा प्लॅन’, उभी केली तीन हजार कार्यकर्त्यांची फौज!
सुडाचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी- जयराम रमेश
काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनीदेखील भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. “क्षुद्रता आणि सुडाचे दुसरे नाव मोदी आहे. मागील ५९ वर्षांपासून एनएमएमएलमध्ये दुर्मिळ पुस्तके, दुर्मिळ वस्तू आहेत. हे संग्रहालय आता ‘प्राइम मिनिस्टर्स म्युझियम ॲण्ड लायब्ररी सोसायटी’ या नावाने ओळखले जाणार आहे. भारताचे शिल्पकार असलेल्या पंडित नेहरू यांचा वारसा नष्ट करण्यासाठी मोदी काहीही करायला तयार आहेत. एक खूपच छोटा माणूस तो स्वत:च्या असुक्षिततेच्या ओझ्याखाली दबलेला आहे,” असे जयराम रमेश म्हणाले आहेत.
काँग्रेसच्या टीकेला जेपी नड्डा यांनी दिले उत्तर
काँग्रेसच्या या टीकेला भाजपाने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्वीट्स करीत काँग्रेसवर टीका केली आहे. “एका घराणेशाहीव्यतिरिक्त देशात असे अनेक नेते होऊन गेले ज्यांनी भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेले आहे. पंतप्रधान संग्रहालय हे राजकारणाच्या पलीकडे आहे. हे समजून घेण्याची काँग्रेसकडे क्षमता नाही,” असे जे. पी. नड्डा म्हणाले. तसेच पंतप्रधान संग्रहालयात देशाच्या प्रत्येक माजी पंतप्रधानांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे. तसेच देशाचे पहिले पंतप्रधान राहिलेल्या पंडित नेहरू यांना समर्पित केलेले जे संग्रहालय होते, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही जे. पी. नड्डा यांनी सांगितले.
हेही वाचा >> लवकरच ८० जातींचा केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश, प्रक्रियेला सुरुवात!
याआधी तुम्ही काय केले ते एकदा पाहावे- बी. एल. संतोष
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी जयराम रमेश यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. “सुवर्ण चतुर्भुज बोर्डामध्ये काय घडले होते, याची तुम्हाला आठवण आहे का? तुम्ही देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो काढून टाकला होता. तुम्ही याआधी काय केलेले आहे, हे एकदा पाहावे,” असे प्रत्युत्तर संतोष यांनी दिले.
एनएमएमएल सोसायटीमध्ये भाजपा नेत्यांचा समावेश
साधारण वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्युझियमचे उद्घाटन केले होते. त्यानंतर भाजपाने एनएमएमएल सोसायटीतून काँग्रेसच्या नेत्यांची नावे वगळली होती. त्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी, अनुराग ठाकूर अशा भाजपाच्या नेत्यांचा एनएमएमएल सोसायटीत समावेश करण्यात आला होता.
हेही वाचा >> समान नागरी कायदा म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठीची स्टंटबाजी? देशातील वेगवेगळ्या संस्थांनी मांडली भूमिका; जाणून घ्या सविस्तर
राजनाथ सिंह यांनी केले निर्णयाचे स्वागत
मिळालेल्या माहितीनुसार एनएमएमएल सोसायटीच्या बैठकीत ‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी’चे (एनएमएमएल) नाव बदलून ‘प्राइम मिनिस्टर्स म्युझियम ॲण्ड लायब्ररी’ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या बैठकीला सोसायटीचे अनेक सदस्य उपस्थित होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत एनएमएमएलचे नाव बदलण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. या नव्या संग्रहालयात देशातील सर्व माजी पंतप्रधानांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे संग्रहालयाचे नाव बदलण्याच्या निर्णयाचे राजनाथ सिंह यांनी स्वागत केले.
एनएमएमएलचा इतिहास काय?
दरम्यान, दिल्लीतील तीन मूर्ती भवन हे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान होते. पुढे १६ वर्षे ते या निवासस्थानात वास्तव्यास होते. याच कारणामुळे साधारण सहा दशकांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांच्या हस्ते ही वास्तू नेहरू यांना समर्पित करण्यात आली होती. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एडविन ल्युट्येन्स यांच्या राजधानीचा भाग म्हणून १९२९-३० या काळात या वास्तूची उभारणी करण्यात आली. या इमारतीला तेव्हा ‘फ्लॅगस्टाफ हाऊस’ म्हटले जायचे. भारतातील ब्रिटिशांच्या सैन्याचे तत्कालीन कमांडर-इन-चीफ या इमारतीत वास्तव्यास होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑगस्ट १९४८ साली या वास्तूला पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान म्हणून घोषित करण्यात आले. पुढे या वास्तूत पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या निधनापर्यंत याच इमारतीत वास्तव्यास होते. नेहरू यांच्या निधनानंतर ही वास्तू त्यांना समर्पित करण्यात आली. तेथे एक वस्तुसंग्रहालय आणि ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली.