कर्नाटकच्या निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान झाले. १३ मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटकची निवडणूक आता मागे पडली आहे. दुसरीकडे याच वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर येथे भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबू रोड येथील एका सभेला संबोधित करताना काँग्रेसवर सडकून टीका केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्यातील वादवरही भाष्य करत त्यांनी काँग्रेसकडून राजस्थानच्या जनतेकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप केला.
“संपूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात असेल तर मग राजस्थानच्या विकासाकडे कोण पाहील? काँग्रेसच्या शासनकाळात राजस्थानमधील कायदा आणि सुव्यवस्था डळमळीत झाली आहे. काही लोकांना खुश ठेवण्यासाठी काँग्रेस निर्णय घेण्यास टाळाटाळ करते,” असा आरोप मोदी यांनी केला.
हेही वाचा >> Video: भाजपाने वाटलेल्या साड्या, कोंबड्या मतदारांनी नाकारल्या; मतदानाआधी सर्व वस्तू भाजपा नेत्याच्या घरासमोर फेकल्या!
मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कशी बळकावता येईल यासाठी स्पर्धा- मोदी
“राजस्थानमध्ये राजकारणाचा घाणेरडा चेहरा पाहायला मिळत आहे. लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कशी बळकावता येईल? मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कशी वाचवता येईल? याचाच कायम विचार सुरू आहे. येथील मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या आमदारांवर तसेच आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. सरकारमध्ये असणारेच सरकारची कशी बदनामी करावी, या विचारात गुंतलेले असतात,” असे म्हणत मोदी यांनी पायलट-गेहलोत वादावर बोट ठेवले.
काँग्रेसकडून दहशतवाद्यांना पुरक भूमिका – मोदी
१३ मे २००८ रोजी जयपूर येथे बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटाला १३ मे रोजी १५ वर्षे पूर्ण होतील. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून दहशतवादाला खतपाणी घातले जाते, असा आरोप मोदी यांनी केला. “तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी काँग्रेसने नेहमीच दहशतवाद्यांना सोईची असणारी भूमिका घेतली. दहशतवाद्यांच्या विचारधारेसोबत राहण्याची काँग्रेसने एकही संधी सोडलेली नाही. या बॉम्बस्फोचा खटला काँग्रेसने पूर्ण ताकदीने लढला नाही. परिणामी या प्रकरणातील दोषींची निर्दोष सुटका करण्यात आली. काँग्रेस आता हे सत्य लपवू पाहात आहे. मात्र सत्य सर्व जगासमोर आलेले आहे,” अशी टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली.
हेही वाचा >> Karnataka Exit Polls : एक्झिट पोलवर भाजपा नाराज, काँग्रेसला गुदगुल्या, जेडीएसने मान्य केले अपयश
कर्नाटकमधील निवडणुकीसाठी काँग्रेसने राजकारण केले- मोदी
कर्नाटकमधील निवडणूक संपलेली आहे. असे असले तरी कर्नाटकधील हक्की-पिक्की आदिवासी बांधवांचा उल्लेख करत मोदी यांनी काँग्रेसला घेरले. “हक्की-पिक्की आदिवासी सुदान तसेच आफ्रिकन देशांत व्यापार करतात. मात्र सुदान देशातील युद्धग्रस्त परिस्थितीत हक्की-पिक्की समाजाचे काही लोक अडकले होते. भाजपा सरकार त्यांची तेथून सुटका करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काँग्रेसने या मुद्द्याचे राजकारण केले. काँग्रेसने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. सुदान हा वेगळा देश आहे. तेथे संघर्ष सुरु आहे. आम्ही त्यांना शांततेत भारतात आणण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र काँग्रेसने आरडाओरड केली. त्यामुळे तेथे अडकलेल्या आदिवासी बांधवांचे चेहरे सार्वजनिक झाले. काँग्रेसमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला. काँग्रेसने असे का केले? सुदानमधील युद्धजन्य परिस्थितीत एखाद्या आदिवासी बांधवाचा मृत्यू व्हावा अशी काँग्रेसची इच्छा होती. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मोदींचा गळा धरता येईल, अशी काँग्रेसची योजना होती. काँग्रेस या प्रकरणात काहीतरी गडबड होण्याची वाट पाहात होती,” असा गंभीर आरोप मोदी यांनी काँग्रेसवर केला.
हेही वाचा >> अशोक गेहलोत-सचिन पायलट यांच्यात पुन्हा संघर्ष! काँग्रेस हायकमांडची अडचण; कर्नाटकच्या निवडणुकीनंतर घेणार भूमिका!
“मोदी फक्त १४० कोटी जनतेसमोर झुकतो”
“काँग्रेस पक्ष मात्र एक गोष्ट विसरला आहे. मला वाटतं त्यांनी मोदीला अद्याप ओळखलेले नाही. त्यांनी हे ओळखायला हवे की मी मोदी आहे. मी अचडणीत असलेल्या लोकांच्या मदतीसाठी मी काहीही करू शकतो. करोना महासाथीच्या काळात काँग्रेसने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू व्हावा असे काँग्रेसला वाटायचे. या माध्यमातून ते मोदीवर टीका करण्याची संधी शोधत होते. मात्र मोदीने त्यांच्यापुढे हार मानली नाही. त्यांच्या कटकारस्थान आणि भीतीला मी घाबरलो नाही. मोदी फक्त देशातील १४० कोटी जनतेसमोर झुकतो,” असे मोदी म्हणाले.
२०१४ नंतर देशाचे चित्र बदलले
“काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी गरिबी हटवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे एक फसवे आश्वासन होते. २०१४ सालापर्यंत जवळपास १० कोटी लोकांना घरात शौचालय नव्हते. ४० कोटी लोकांचे बँक खाते नव्हते. लाखो लोकांच्या गावात पक्के रस्ते नव्हते. १६ कोटी घरांना वेळेवर पाणी मिळत नव्हते. २०१४ नंतर हे चित्र बदलले” असा दावाही मोदी यांनी केला.