Narendra Modi ek rahenge toh safe rahenge Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज (१८ नोव्हेंबर) प्रचाराचा शेवटचा दिवस असून, दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वच पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्यभर जोरदार प्रचार केला. मात्र, या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘हम एक है, तो सेफ हैं’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या दोन घोषणांची बरीच चर्चा झाली. अशातच मंगळवारी विदर्भातील एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “लोकांची एकजूट राहिली नाही, तर काँग्रेस त्यांचे आरक्षणाचे फायदे हिसकावून घेईल. त्यामुळेच मी म्हणतो, ‘हम एक है, तो सेफ हैं’ (आपण एकत्र राहिलो, तरच सुरक्षित राहू)”. मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रचारसभेत ‘हम एक है, तो सेफ हैं’चा नारा दिला होता. तत्पूर्वी त्यांनी हा नारा सर्वप्रथम ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील केवडिया येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दिला होता.
मोदी म्हणाले, “काँग्रेसमुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, भाजपा आमच्या ‘मंडलबरोबर कमंडल’ या सामाजिक न्यायाच्या राजकारणाशी जोडलेली आहे. सवर्ण, ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींमधील सर्वांनाच हिंदू या एकाच छताखाली एकत्र करणे हे भाजपाचं मूळ उद्दिष्ट आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून ओबीसी, एससी, एसटींमधील लोकांना काँग्रेसपासून विभक्त करून, भाजपाच्या जवळ आणणे यासाठी भाजपाने जंग जंग पछाडले आहे. अल्पसंख्याकांच्या फायद्यासाठी काँग्रेस ओबीसींच्या आरक्षणावर डल्ला मारू पाहत असल्याचा आरोप मोदी यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. सोमवारी झारखंडमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले, “ओबीसी, एससी व एसटी समुदायातील लोकांमधील एकी जसजशी वाढू लागली आहे, तसतसं काँग्रेसचं पतन होऊ लागलं आहे”.
हे ही वाचा >> Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ घोषणेमागचा उद्देश काय? निवडणुकीत किती फायदा होणार?
ओबीसी एकत्र आले अन् काँग्रेसचं सरकार कोसळलं : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपला देश स्वतंत्र झाल्यापासून देशावर काँग्रेसनंच राज्य केलं आहे. सात दशकं देशात काँग्रेस सर्वशक्तिमान होती. जवाहरलाल नेहरूंपासून ते राजीव गांधींपर्यंत त्या शाही घराण्यातील सर्वांनाच आरक्षणाचा तिरस्कार होता. त्यामुळे आजवर काँग्रेसनं कधी आरक्षणावर बोलण्याचं धाडस दाखवलं नाही. परिणामी एससी, एसटी व ओबीसी हे वेगवेगळ्या छोट्या जातींमध्ये विखुरले गेले. त्यांच्याकडे संख्याबळाचा आभाव असल्यानं ते सत्तेपासून दूर राहिले. मात्र, हळूहळू या सर्व समुदायांना बाबासाहेब आंबेडकर यांना नेमकं काय म्हणायचंय ते समजू लागलं. त्यामळे एससी, एसटी एकत्र आले आणि मजबुतीनं उभे राहिले. त्यानंतर काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं राहिलं. १९९० मध्ये पहिल्यांदाच ओबीसी एकत्र आले तेव्हा काँग्रेसचं सरकार कोसळलं.
हे ही वाचा >> २०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
…म्हणून काँग्रेसला भाजपाची घोषणा खुपतेय; भाजपाची टीका
पंतप्रधान म्हणाले, “काँग्रेसला ओबीसी, एससी, एसटी समुदायाचं आरक्षण हिसकावून घ्यायचं असून, ते अल्पसंख्याकांना द्यायचं आहे. म्हणूनच मला वाटतं की, आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. एक रहेंगे, तो सेफ रहेंगे (एकत्र राहू, तरच सुरक्षित राहू)”. पाठोपाठ अमित शाह म्हणाले, “काँग्रेस ओबीसी, एससी, एसटींचा आरक्षणातील वाटा मुस्लिमांना देण्याचा विचार करीत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनीदेखील मंगळवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हाच मुद्दा मांडला. प्रसाद म्हणाले, “निवडणुकीतील फायद्यांसाठी काँग्रेसने फुटीरतावादी घटकांबरोबर हातमिळवणी केली आहे. परंतु, मोदी सर्व समुदायांना काँग्रेसच्या कटाची माहिती देत आहेत आणि ‘हम एक रहेंगे, तो सेफ रहेंगे’चा नारा देत आहेत. हीच गोष्ट काँग्रेसला खुपतेय. म्हणूनच त्यांनी मोदींच्या या घोषणेविरोधात निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे.
हे ही वाचा >> निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय प्रचाराची ‘संगीत’ खुर्ची; सर्वच पक्षांकडून समाजमाध्यमातून ‘सिनेमॅटिक’ प्रचारावर भर
काँग्रेसवर मात करण्यासाठी मोदींची नवी रणनिती
काँग्रेस काही वर्षांपासून ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी आणि सत्ता मिळाल्यास अशी जनगणना करण्याचे आश्वासन देत काँग्रेसने त्यांची उद्दिष्टे लोकांपर्यंत पोहोचवली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला याचा काही प्रमाणात फायदादेखील झाला. त्यामुळे आता काँग्रेसकडे गेलेले मतदार परत आपल्याकडे यावेत यासाठी भाजपा व मोदी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. मोदींची ही घोषणा हा या प्रयत्नांचाच एक भाग आहे.