Narendra Modi to Meet Mohan Bhagwat in RSS Headquarters Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे घनिष्ठ नाते आहे. राजकीय जीवनाला सुरुवात करण्यापूर्वी मोदी यांनी पूर्णवेळ संघ प्रचारक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. पंतप्रधान झाल्याच्या अकरा वर्षांत त्यांनी अनेक कार्यक्रम नागपुरात घेतले. यापूर्वी एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ते कधीच गेले नव्हते. मात्र, आता ते पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून संघ मुख्यालयाला भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत येत्या ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपुरात एका कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेशीमबागेतील स्मृतिमंदिर येथील डॉ. केशव हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. स्मारक समितीच्या वतीने भैय्याजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत. या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. संघाचे हे शताब्दी वर्ष असल्याने मोदींची ही भेट फार महत्वाची ठरणार आहे.

नागपुरात ३० मार्च रोजी माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर हे संघाशी संबंधित आहे. माधव नेत्रालयाची नवीन इमारत हिंगणा रोडवरील वासुदेवनगर मेट्रो स्टेशनजवळ ६.८ एकर परिसरात प्रस्तावित आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. मोहन भागवत व पंतप्रधान मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोविंदगिरी महाराज, अवधेशानंद गिरी महाराज हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

भाजपाच्या नव्या अध्यक्ष निवडीवर चर्चा

दी इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीला लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याने मोदी व संघाच्या वरिष्ठ नेत्यांमधील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. भाजपा आता ज्या अध्यक्षांची नियुक्ती करेल ते अध्यक्ष २०२६ पर्यंत पक्षाची धुरा सांभाळतील. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला आहे.

नड्डांच्या वक्तव्यामुळे भाजपा व संघात दुरावा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपाची मातृसंस्था आहे. मात्र गेल्या वर्षी भाजपा व संघाचे संबंध ताणले गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यातच गेल्या वर्षी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे संघ परिवार दुखावला गेला होता. अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राजकारणातील अस्तित्व कसं बदलत गेलं आहे? असा प्रश्न नड्डा यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना नड्डा म्हणाले, “भारतीय जनता पार्टी आता स्वयंपूर्ण झाली असून आपला कारभार स्वतंत्रपणे करते.”

संघाच्या नाराजीचा भाजपाला लोकसभा निवडणुकीत फटका

जे. पी. नड्डा म्हणाले होते की “सुरुवातीच्या काळात आम्ही (भाजपा) अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज भासत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपा स्वत:चा कार्यभार स्वतंत्रपणे सांभाळते. हा या दोन्ही कालखंडातला फरक आहे.” भाजपा आता संघापेक्षा मोठी आहे, मोदींची लोकप्रियता सर्वोच्च स्थानी आहे, असा संदेश नड्डा यांनी संघाला दिल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे संघ परिवार नाराज झाला. त्याचा भाजपाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारची घोषणा (४०० हून अधिक जागा जिंकण्याची) केली होती. मात्र, भाजपा बहुमत (२७३ जागा) देखील मिळवू शकली नाही.

…अन्, संघाच्या पुनरागमनानंतर भाजपा मजबूत झाली

निवडणुकीनंतर भाजपा नेतृत्वाने संघ व त्यांच्यातील अंतर कमी करण्याचं प्रयत्न केलं. त्यामुळे संघाने त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली. परिणामी भाजपाला हरियाणा व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जिंकता आल्या. महाराष्ट्रात तर त्यांनी गेल्या पाच दशकांमधील सर्वोत्तम कामगिरी केली. भाजपा व संघ नेत्यांची आगामी बैठक पक्षासमोरील सध्याच्या व यापुढील आव्हानांना कसं तोंड द्यायचं यासाठीची रणनिती आखण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

नागपूरला जाण्यापूर्वी मोदींची संघाबद्दल स्तुतीसुमने

पंतप्रधान मोदी संघ यांनी भेटीच्या तोंडावर एका पॉडकास्टमध्ये संघाबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली. संघाचं त्यांच्या आयुष्यातील योगदानही त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले, “यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जगात आरएसएसपेक्षा मोठा ‘स्वयंसेवक संघ’ नाही. कोट्यावधी लोक संघाशी जोडलेले आहेत. संघाला समजून घेणे इतके सोपे नाही. त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संघ जीवनाला एक उद्देश आणि दिशा देतो. देश हेच सर्वस्व आहे आणि लोकांची सेवा हीच देवाची सेवा आहे. धर्मग्रंथांमध्ये जे काही सांगितले आहे, स्वामी विवेकानंदांनी जे काही सांगितले आहे, संघही तेच करतो.