Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीचा मुद्दा उपस्थित केला आणि काँग्रेसने कायमच कलाकार, नेते यांच्यावर कसा अन्याय केला ते उदाहरणांसह सांगितलं. तसंच जे लोक संविधान खिशात घेऊन फिरतात त्यांना वाटतं की त्याचं महत्त्व कसं सममजेल असा होटालाही नरेंद्र मोदींनी लगावला.
आणी बाणीचा उल्लेख करत काय म्हणाले नरेंद्र मोदी?
१) पंडित नेहरु पंतप्रधान होते त्यावेळी मुंबईत मजुरांचा एक संप होता. त्यावेळी मजरुह सुल्तानपुरी यांनी एक कविता म्हटली होती. नेहरु कॉमनवेल्थ का दास है. ही कविता म्हटली हा गुन्हा घडल्याने त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं.
२) बलराज सहानी एका मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्यांना तुरुंगात धाडण्यात आलं.
३) लता मंगेशकर यांच्या भावाने म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांनी वीर सावरकर यांच्या एका कवितेला चाल लावली आणि ते गाणं आकाशवाणीवर प्रसारित करण्याचं ठरवलं. त्यांची आकाशवाणीमधून हकालपट्टी करण्यात आली. हृदयनाथ मंगेशकर यांनीही हा प्रसंग एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.
४) देशाने असाही काळ पाहिला आहे की देवानंद यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला नाही म्हणून दूरदर्शनवर त्यांच्या चित्रपटांना बंदी घालण्यात आली.
५) किशोर कुमार यांनी काँग्रेससाठी गाणं म्हटलं नाही म्हणून त्यांना आकाशवाणीचे दरवाजे बंद झाले होते.
हे पाच आरोप करत काँग्रेसवर मोदींनी जोरदार टीका केली. या टीकेनंतर काँग्रेसने गदारोळ सुरु केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं भाषण केलं.
आणीबाणीचे ते दिवस आणि तो काळ देश कधीही विसरु शकत नाही-मोदी
मोदी पुढे म्हणाले, “आणीबाणीचे ते दिवस देश कधीही विसरु शकत नाही. जे लोकशाहीच्या गोष्टी करतात त्यांनी आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडीससह अनेक महान नेत्यांच्या हातात बेड्या घातल्या गेल्या होत्या. देशाचे प्रसिद्ध नेते, त्यांना बेड्या घालण्यात आल्या साखळदंडाने बांधण्यात आलं होतं. आज ते लोक संविधानाबाबत बोलत असतील तर त्यांच्या तोंडी तो शब्द शोभत नाही.”
सत्तेच्या सुखासाठी कुटुंबं देशोधडीला लागली हे वास्तव-मोदी
सत्तेच्या सुखासाठी आणि शाही कुटुंबाच्या अहंकारासाठी लाखो कुटुंबं त्या काळात देशोधडीला लागली. आपल्या देशाला तुरुंग करण्यात आलं होतं. अत्यंत मोठा संघर्ष झाला, स्वतःला तीस मार खाँ समजणाऱ्यांना नंतर गुडघे टेकावे लागले. भारताच्या नसांनसांत लोकशाही भिनलेली आहे त्यामुळेच असं घडलं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.