Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे पॉडकास्टर लेक्स फ्रीडमॅन यांच्याशी पॉडकास्टमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि विविध प्रश्नांना उत्तरंही दिली. आपलं बालपण, आई वडील तसंच गुजरात दंगे या सगळ्या विषयांवर त्यांनी उत्तरं दिली. तसंच एक खास किस्साही सांगितला.
मृत्यूची भीती वाटते का? या प्रश्नावर मोदी काय म्हणाले?
लेक्स फ्रिडमन यांनी मोदींना अनेक सवाल विचारले. फ्रिडमॅन म्हणाले, तुम्ही तुमच्या मृत्यूचा विचार करता? तुम्हाला मृत्यूची भीती वाटते? यावर मोदी जोरात हसले. मोदी म्हणाले, “मी या बदल्यात तुम्हाला एक सवाल करू शकतो का? जन्मानंतर जीवन आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण त्यात अधिक निश्चित कोणती बाजू आहे? त्यावर मोदींनी स्वत: उत्तर दिलं मृत्यू. जो जन्माला येतो, त्याचा मृत्यू होतोच हे आपल्याला माहीत आहे. आयुष्य तर फुलतं”, असं मोदी म्हणाले. यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक किस्साही सांगितला.
आयुष्यात कधी बूटही घातले नव्हते..
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी अत्यंत गरीबी आणि हलाखी पाहिली आहे. माझं आयुष्य गरीबीत गेलं आहे. पण या गरिबीचं कधीही ओझं वाटलं नाही. कारण जो माणूस उत्तम प्रकारचे बूट घालतो त्याच्याकडे ते नसतील तर त्याला वाटतं की आपल्याकडे उत्तम दर्जाचे बूट नाहीत. आम्ही तर आयुष्यात कधी बूट घातले नव्हते. आम्हाला माहीतही नव्हतं की बूट घालणं म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट असते. कुणाशी तुलना करावी अशीही आमची परिस्थिती नव्हती. माझे आई आणि वडील दोघंही अपार कष्ट करायचे. कष्ट करुनच त्यांनी आम्हाला वाढवलं आणि घडवलं.”
माझे वडील शिस्तप्रिय होते-मोदी
माझे वडील अतिशय शिस्तप्रिय होते. सकाळी ४ किंवा ४.३० ला ते घरातून निघायचे. बरंच अंतर कापत आधी मंदिरांमध्ये जात आणि त्यानंतर दुकानात जायचे. माझे वडील त्या काळी प्रचलित असलेले चामड्याचे बूट वापरत असत. गावांमध्ये असे बूट तेव्हा हाताने शिवले जायचे. त्या बुटांमधून टक-टक असा आवाज यायचा. माझे वडील जेव्हा दुकानात जायचे तेव्हा त्यांच्या बुटांचा आवाज ऐकून लोक म्हणायचे हा दामोदर भाईंच्या बुटांचा आवाज आहे. माझे वडील अथक परिश्रम करत असत. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेक्स यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं.
मी शाळेत जातानाही बूट वापरले नाहीत-मोदी
याच पॉडकास्टमध्ये मोदी म्हणाले, मला व्यवस्थित आठवतं आहे.. मी शाळेत जायचो तेव्हाही कधी बूट वापरले नाहीत. एक दिवस मी शाळेत चाललो होतो. मला माझे मामा भेटले. ते म्हणाले अरे तू शाळेत असा चालला आहेस? तुझ्या पायांमध्ये बूट नाहीत? मी म्हटलं नाही. त्यावेळी मला माझ्या मामांनी कॅनव्हासचे बूट घेतले. त्या बुटाची किंमत तेव्हा १० ते १२ रुपये असेल. शाळेत ते बूट मी वापरु लागतो तेव्हा त्यावर डाग पडायचे. मग मी शाळा सुटली की शिक्षक जे खडू टाकून देत असत ते गोळा करायचो, ते घरी आणत असे. त्यानंतर ते खडूचे तुकडे पाण्यात भिजवायचो आणि कॅनव्हासच्या बुटांना लावायचो ते बूट चमकायचे. माझ्यासाठी ते खडूचे तुकडे एका अर्थाने माझी दौलतच होती. अशीही आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली.