हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. हिमचाल प्रदेशमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या असून गुजरामधील निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या निवडणुका लक्षात घेता पुन्हा एकदा रोजगार आणि नोकरी मुद्दा चर्चेत आला आहे. या दोन्ही राज्यांमधील निवडणुकांसाठी प्रचाराचा हा प्रमुख मुद्दा होण्याची शक्यता लक्षात घेता केंद्रातील भाजपा सरकारने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून साधारण १० लाख तरुणांना रोजगार देण्याचे जाहीर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
हेही वाचा >> विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये बंडखोरी! अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवल्यास कारवाईचा इशारा
गुजरात, हिमचाल प्रदेशमध्ये नोकरीचा मुद्दा केंद्रस्थानी?
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांमध्ये तरुणांच्या नोकरीचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदम पार्टी अर्थात (आप) पक्षाने उडी घेतली आहे. या पक्षाकडून येथील १० लाख तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सत्तेत आल्यानंतर आप पक्षाकडून काय-काय केले जाईल याबद्दल आपने ऑगस्ट महिन्यात सविस्तर सांगितले होते. यामध्ये आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी, १० लाख तरुणांना नोकरी, तसेच पाच वर्षात राज्यातील पूर्ण तरुणांना नोकरी यावर त्यांचा पक्ष कसे काम करेन, याबाबत सांगितले होते. आप वगळता गुजरातमध्ये अन्य कोणत्याही पक्षाने तरुणांना नोकरी देण्याचे थेट आश्वासन दिलेले नाही. केजरीवाल यांनी खासगी नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करू असे यापूर्वी सांगितलेले आहे.
हेही वाचा >>> प्रशांत किशोर यांच्या ‘त्या’ विधानानंतर चर्चेला उधाण; आता नितीश कुमार यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले “मी ज्यांना ज्यांना…”
तर दुसरीकडे गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अद्याप नोकरीसंदर्भात कोणतेही थेट आश्वासन दिलेले नाही. मात्र सप्टेंबर महिन्यात खासदार राहुल गांधी यांनी नोकरीच्या प्रश्नाबाबत भाष्य केले होते. त्यांनी सप्टेंबर महिन्यात अहमदाबादमध्ये परिवर्तन संकल्प रॅलीमध्ये नोकरीच्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले होते. “मोठ्या उद्योगांकडून रोजगाराची अपेक्षा ठेवता येणार नाही. मध्यम उद्योग हे नव्या रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. आम्ही गुजरातमधील तरुणांना नोकरी देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. येथील १० लाख तरुणांना आम्ही नोकरी देऊ,” असे राहुल गांधी म्हणाले होते.
हेही वाचा >>> गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने AIMIM ने घेतला मोठा निर्णय; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?
दरम्यान, नोकरी आणि रोजगाराच्या मुद्यावरून गुजारत विधानसभा निवडणुकीला रंग चढण्याची शक्यता असताना भाजपाने दिवाळीपूर्वी ७५ हजार तरुणांना थेट नोकरीचे नियुक्तीपत्र दिले आहे. आगामी कळात रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र सरकारने १० लाख तरुणांना नोकरी देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. गुजरात निवडणुकीच्या दृष्टीने येथील भाजपा आपला जाहीरनामा पुढील आठवड्यात प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यात भाजपा कोणत्या घोषणा करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.