लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : ज्या मैदानावर रणजी स्पर्धेचे क्रिकेट सामने होतात, असे शहरात एकमेव हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान आहे, मैदानावरील खेळपट्टीची अगदी लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. त्यामुळे या मैदानावर शक्यतो राजकीय कार्यक्रम टाळावेत, ही महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी दुर्लक्षित करण्यात आल्याचे चित्र आहे. १०० बाय १०० फूट क्रिकेट खेळपट्टी संरक्षित करावी, या अटीवर नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने शुक्रवारी होणाऱ्या शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी ना हरकत दिली आहे.
अलीकडेच या मैदानावर महाराष्ट्र-बडोदा रणजी सामना पार पडला होता. शहरात क्रिकेटसाठी हे एकमेव मैदान आहे. त्याचा राजकीय पक्षांकडून जाहीर सभा व तत्सम कार्यक्रमांसाठी वापर होतो. रणजी सामन्यानिमित्त येथे आलेले महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी मैदानावरील खेळपट्टीचे महत्व अधोरेखीत करत राजकीय कार्यक्रम टाळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
खेळपट्टीची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अधिकारी जेव्हा येतात, तेव्हा ते प्रथम खेळपट्टी बघतात. त्यामुळे ज्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रणजी सामने होतात, त्या मैदानावर शक्यतो राजकीय कार्यक्रम टाळावेत, अशी सूचना त्यांनी केली होती.
यानंतर अवघ्या काही दिवसांतच शिवसेनेतर्फे (एकनाथ शिंदे) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी मैदानाची मागणी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी पाच ते रात्री १० या वेळेत उपमुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. यावर नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने सभा आयोजनास कुठलीही हरकत नसल्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. मैदानावरील १०० बाय १०० फूटची खेळपट्टी संरक्षित करण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
आजवर अनेक राजकीय नेत्यांच्या सभेसाठी हे मैदान देण्यात आलेले आहे. मागील विधानसभा निवडणूक प्रचारावेळी या मैदानावर शिवसेनेचे उध्दव ठाकरे आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेसाठी मैदान नाकारणे संघटनेला अशक्यप्राय होते. यातून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांची सूचना तूर्तास बाजुला ठेवणे क्रमप्राप्त ठरल्याचे दिसत आहे.