नाशिक – भाजप, राष्ट्रवादीचे दावे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेल्या नाशिक लोकसभेच्या जागेवर शक्य तितक्या लवकर आपला उमेदवार जाहीर करावा, यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देत शक्ती प्रदर्शन केले. शिंदे गटावर ही वेळ येण्याचे कारणही तसेच आहे. सेनेच्या ताब्यातील हा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी भाजपने कंबर कसली असून राष्ट्रवादी अजित पवार गटही या जागेसाठी आशावादी आहे. महायुतीत मनसेही समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या परिस्थितीत या जागेवर तडजोड होऊ नये म्हणून स्वत:कडे असणारी जागा राखण्यासाठी शिवसेनेला मित्रपक्षांशी झुंजावे लागत आहे.
विद्यमान खासदार असलेल्या पक्षाला जागा सोडण्याबद्दल महायुतीच्या राज्यस्तरीय नेत्यांमध्ये एकमत असल्याचे सांगत भाजपने अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. परंतु, मित्रपक्ष शिवसेनेला त्या निकषाच्या आधारे मात्र अनेक ठिकाणी अद्याप उमेदवार जाहीर करता आले नाहीत. नाशिक हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण. या जागेवरून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच आहे. शिवसेना नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची केलेली घोषणा भाजप नेत्यांनी हाणून पाडली. गोडसे यांच्यावर युतीधर्म पाळला नसल्याचे टिकास्त्र सोडले. छगन भुजबळ हेही नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दोन्ही मित्रपक्ष जागा देण्याच्या विरोधात असताना कधीकाळी बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये मनसेकडूनही दावा सांगितला जाण्याची धास्ती सेनेच्या वर्तुळात आहे. याची परिणती मुख्यमंत्र्यांच्या ठाणेस्थित निवासस्थानासमोर ठिय्यात झाली.
हेही वाचा – वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल
नाशिकची जागा शिवसेनेकडे राहील की नाही, याबद्दल अनेकांना साशंकता आहे. भाजप एकतर उमेदवार बदला अन्यथा, जागा आम्हाला द्या, या भूमिकेवर अडून बसल्याचे सांगितले जाते. या निमित्ताने महायुतीतील बेबनाव उघड झाला असून सारे पक्ष परस्परांविरोधात शड्डू ठोकत आहेत. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे वैतागलेल्या गोडसे यांनी नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते.
आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीची प्रतिमा मलीन होत आहे, मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची जाणीव राष्ट्रवादीचे सरचिटणीस अर्जुन टिळे यांना करून देण्याची वेळ आली. घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे कुठलेही वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला गेला. भाजपचा विरोध मोडून काढण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, खासदार गोडसे आदींच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ठाण्यात शक्ती प्रदर्शन केले.