नाशिक – आजवर कुठल्याही वादात न सापडलेले आणि साधी राहणी, मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ वाजे यांना शिवसेना ठाकरे गटाने एकनिष्ठतेचे फळ म्हणून नाशिक लोकसभेची उमेदवारी दिली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये वाजे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
सिन्नर तालुक्यात वाजे कुटुंब हे बडे प्रस्थ मानले जाते. राजाभाऊ यांचे आजोबा शंकरराव वाजे हे आमदार होते. वडील प्रकाश वाजे हे देखील राजकारणात होते. कौटुंबिक राजकीय वारसा असूनही राजाभाऊ अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर राहिले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत वडिलांचा पराभव झाल्यामुळे ते राजकारणात आले. सिन्नर तालुक्यातील डुबेरे हे त्यांचे मूळ गाव. शेती आणि पेट्रोल पंप व्यवसाय सांभाळणारे राजाभाऊ हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. पुण्यातील शिवाजी सैनिक शाळेत त्यांचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले. नाशिकच्या भि.य.क्ष. महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. परंतु, कायद्याचे शिक्षण घेण्याची मनिषा अपूर्णच राहिली. शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. सिन्नरमध्ये जनसेवा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत झाले.
हेही वाचा – कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?
आमदारकीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सव्वाकोटीहून अधिकची रक्कम वाजे यांनी औषधोपचारासाठी गरजूंना मिळवून दिली होती. नाशिक-पुणे आणि शिर्डी- इगतपुरी मार्गांवर अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्यात पुढाकार घेतला. विरोधकांवरही टीका न करण्याच्या स्वभावाने ते अस्सल, मुरलेले राजकारणी वाटत नाहीत. साधा सदरा, गळ्यात मफलर असा त्यांचा पेहराव सर्वसामान्यांना आपलेसे करतो. शिवसेना दुभंगल्यानंतर जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले. परंतु, वाजे यांनी ठाकरे यांची साथ सोडली नाही. याची दखल पक्षाने घेतली.
हेही वाचा – राणा दाम्पत्याची चहूबाजूंनी कोंडी, महायुतीतून आव्हान, भाजपमधूनही विरोध
हेही वाचा – आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…
आजवर सिन्नरपुरते मर्यादित राहिलेल्या वाजे यांना थेट लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. सिन्नर तालुक्यात वंजारी समाजाची निर्णायक मते आहेत. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत या समाजाच्या पाठिंब्यावर वाजे हे विजयी झाले होते. या घटकाशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील मूळचे सिन्नरचे आहेत. या माध्यमातून नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा-वंजारी असे नवीन समीकरण जुळवण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाने वाजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे. २०१९ मध्ये अवघ्या २०७२ मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.