नागपूर: नाशिक शहरात ज्या दिवशी (बुधवारी) शिवसेनेचे निर्धार शिबीर होते, त्याच दिवशी तेथील अनधिकृत दर्गा तोडण्यात आला. शिवसेनेच्या शिबिरावरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. असाच प्रकार, याच दिवशी नागपूरमध्ये घडला.

ज्या दिवशी प्रदेश काँग्रेसची सद्भावना यात्रा दंगलग्रस्त भागातून जाणार होती नेमक्या त्याच दिवशी सकाळी अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई करण्यात आली. या दोन्ही घटना योगायोग आहे की विरोधी पक्षाच्या कार्यक्रमांची, आंदोलनाची चर्चाच होऊ नये यासाठी नियोजनपूर्वक घडवून आणल्या गेल्या ? असा सवाल केला जात आहे.असे असलं तर दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असलेले हे सरकार महायुतीला घाबरते का ? असा दुसरा प्रश्नही विचारला जात आहे.

२०१४ ते २०२५ या काळात अडीच वर्षाचा अपवाद सोडला तर सत्ताधाऱ्यांनी कायम विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षात पडलेल्या फुटीकडे याच अनुषंगाने बघितले जाते. २०२४ मध्ये पूर्ण बहुमताने महायुती सरकार सत्तारुढ झाल्यावर तरी त्यांच्या वागणुकीत बदल होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. त्याला कारणही होते ते विरोधकांचे अत्यल्प संख्याबळ. पण कमी संख्याबळअसतानाही बलाढ्य महायुती सरकार विरो्धी पक्षाकडे सुडाच्याच भावनेने बघते हे बुधवारी नाशिक आणि नागपूरमध्ये घडलेल्या घटनांवरून तरी दिसून येते.

एकाच दिवशी तीन प्रमुख कार्यक्रम

बुधवारी १६ एप्रिलला राज्यात तीन प्रमुख कार्यक्रम होते. नाशिकमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) निर्धार शिबीर होते.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण या शिबिराचा केंद्रबिंदू होता. याच दिवशी नागपूरमध्ये काँग्रेसची सद्भभावना यात्रा होती. प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या निमित्ताने प्रथमच नागपूरला आले होते. तिसरा कार्यक्रम अमरावती येथे तेथील विमानतळ उद्घाटनाच होता. या सरकारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या तीनही कार्यक्रम्ंची तारीख आधीच ठरली होती व त्यानुसार त्याचे नियोजनही करण्यात आले होतो. पण अमरावती वगळता नाशिक आणि नागपूरमध्ये विरोधी पक्षाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्त काढण्यात आला. त्यामुळे सहाजिकच विरोधी पक्षाच्या कार्यक्रमावरून लक्ष महापालिकेच्या कारवाईकडे वळले.

नाशिकंमध्ये काय घडले ?

नाशिकमध्ये बुधवारी अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला सुरुवात झाली. म्हणणे मांडण्यासाठी दर्गा ट्रस्टला दिलेली मुदत बुधवारी संपल्यानेच दर्ग्याच्या पाडकामाला सुरूवात करण्यात आली, असा दावा तेथील महापालिकेकडून करण्यात आला. मात्र शिवसेना (ठाकरे)शिबीरात अडथळे आणण्यासाठीच हे काम सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. ज्यांच्या हातात सत्ता आहे, तेच आम्हाला घाबरतात, अजूनही शिवसेनेची दहशत, भीती आहे. नाशिकमध्ये कारवाईसाठी बुधवारचाच दिवस का निवडला ? गोंधळ निर्माण व्हावा, शिवसेनेच्या शिबीरावरचं लक्ष दुसरीकडे जावं, हाच यामागे हेतू असल्याचा आरोप राऊत यांनी नाशिक येथे माध्यमांपुढे बोलताना केला.

नागपूरमध्ये काय घडले ?

औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी विश्वहिंदू परिषदेने केलेल्या आंदोलनामुळे नागपुरात मगील काही दिवसापूर्वी दंगल उसळली होती. दंगलीमुळे निर्माण झालेली दोन धर्माती कटुता दूर करण्यासाठी १६ एप्रिलला काँग्रेसने दंगलग्रस्त भागात शांती, सद्भावना यात्रा काढली. ही यात्रा सकाळी १० वाजताच्या सुमारास निघणार होती. त्याच वेळी शहरातील राजनगरमधील २५ वर्ष जुन्या अनधिकृत झोपडपट्टीवर महापालिकेने बुलडोझर चालवला. विशेष म्हणजे एक दिवसाआधीच जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील नागरिकांना त्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कारवाई केली जाणार नाही, याबाबत आश्वस्थ केले होते. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळीसच पथक झोपडपट्टीतमध्ये गेले. त्यामुळे एकच गोंधळ माजला, महिलांनी विरोध केला. लोकांच्या भावना संतप्त झाल्याने दुपारनंतर ही कारवाई थांबली पण या घटनेमुळे सद्भावना यात्रेची चर्चा काही काळ थांबली.

अमरावतीत कार्यक्रम सुरळीत

अमरावतीमधील सरकारी कार्यक्रम सुरळीत पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीव्दय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची तडाखेबंद भाषणे झाली. डबल इंजिनच्या सरकारला डबल बुस्टर मिळाल्याने हे सरकार गतीने काम करणार असा दावा फडणवीस यांनी केला. नाशिक, नागपूरच्या तुलनेत अमरावतीचाच कार्यक्रमाला वाहिन्यांवर अधिक जागा मिळाली.

काँग्रेसच्या यात्रेवर भाजपची टीका

दंगल होऊन एक महिन्याने काँग्रेसला दंगलग्रस्तांची आठवण झाली, ज्यांची वाहने या दंगलीत जळाली त्यांची साधीभेटही या नेत्यांनी घेतली नाही, आता ते पुळका दाखवत आहेत, दंगलग्रस्तांबाबत काँग्रेसचे अश्रू हे मगरीचे आहेत, अशी टीका भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केली. दटके यांच्याच मतदारसंघात ही दंगल झाली होती हे येथे उल्लेखनीय.