नाशिक : विविध प्रलोभनांनी गाजलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मराठा-ओबीसी वाद, मराठा समाजाच्या मतांची विभागणी आणि स्वत:ची प्रबळ यंत्रणा, यामुळे दराडेंना विजयापर्यंत पोहचता आले.

जवळपास २४ तास चाललेल्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी विजय मिळवला. विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा निश्चित कोटा होता. पहिल्या पसंतीच्या फेरीत तो गाठता न आल्याने बाद फेऱ्यांची मतमोजणी झाली. यातील १९ व्या फेरीअखेर दराडे यांनी कोटा पूर्ण करीत सर्वाधिक पसंतीक्रमाची मते मिळवत विजय मिळवला. त्यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा पराभव केला. शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे हे १९ व्या फेरीनंतर बाद झाले. अंतिम लढत दराडे आणि कोल्हे यांच्यात झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ॲड. महेंद्र भावसार हे खूपच मागे राहिले. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेची ही निवडणूक होत असल्याने निकालास महत्व प्राप्त झाले. केवळ शिक्षक हेच मतदार असल्याने सुशिक्षित मतदारांचा कौल याव्दारे समोर आला. साडी, नथ, कपडे, पैसे वाटप या कारणांनी ही निवडणूक अधिक गाजली. काही शिक्षिकांनी त्यांच्यापर्यंत आलेल्या साड्यांची होळी करुन या प्रवृत्तीचा निषेधही केला होता. गतवेळी शिवसेना पुरस्कृत असणाऱ्या किशोर दराडेंना शिंदे गटाने मैदानात उतरवले होते. नाशिक लोकसभेत यश मिळाल्याने ठाकरे गटाने शिक्षक मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसच्या ॲड. संदीप गुळवेंना ऐनवेळी पक्षात घेऊन तिकीट दिले.

हेही वाचा : एकेकाळी दलितांसाठी आशा ठरलेल्या बसपाचा ‘या’ कारणांमुळे जाणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

शिंदे गटाने लोकसभेतील चुका दुरुस्त करण्याकडे लक्ष दिले. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण दिवस या मतदारसंघात प्रचारासाठी दिला. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची ही संधी असल्याचे सूचित केले. नाशिक, अहमदनगर, जळगाव येथे शैक्षणिक संस्था चालकांशी संवाद साधत शिक्षण संस्था आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. याचाही मतदारांवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये शिक्षकांशी संवाद साधला होता. या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेत दोन गट पडले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गुळवे हे या संस्थेचे संचालक आहेत. मविप्रतील सत्ताधारी त्यांच्या पाठिशी उभे होते. तर संस्थेतील विरोधी गट सहकारमहर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यामागे उभा राहिला. मराठा समाजाच्या दोन्ही उमेदवारांमुळे शिवसेना शिंदे गटाचा विजय सोपा झाला. दराडे यांच्याकडे पाच जिल्ह्यांत पसरलेल्या मतदारसंघाचा अनुभव होता. सुज्ञ मतदार असूनही मराठा-ओबीसी वादाचा मुद्दा प्रचारात डोकावला. पक्ष संघटनेकडून ताकद, रसद मिळाली असली तरी दराडे यांच्या स्वत:च्या यंत्रणेचा त्यांच्या विजयात अधिक सहभाग राहिला. शिक्षकांच्या प्रलंबित देयकांचा विषय मार्गी लावल्याचाही त्यांना फायदा झाला. यामुळेच भाजपशी संबंधित कोल्हे यांनी प्रचारात सर्वच बाबतीत दराडे यांच्या तोडीसतोड यंत्रणा उभारूनही ते पराभूत झाले. ठाकरे गट खिजगणतीतही राहिला नाही.