पीटीआय, श्रीनगर
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची बुधवारी शपथ घेतली. केंद्रशासित प्रदेशाचे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला व पाच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जम्मूतील सुरिंदर चौधरी हे उपमुख्यमंत्री असतील. ओमर यांच्याकडे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद आले आहे. यापूर्वी पूर्ण राज्य असताना २००९ ते २०१४ या कालावधीत ते मुख्यमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमर यांचे अभिनंदन केले. जम्मूचे तीन तर काश्मीर खोऱ्यातील दोन मंत्री नेमून संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. चौधरी यांच्याव्यतिरिक्त साकिना मसूद, जावेद दर, आणि सतीश शर्मा, जावेद राणा, काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सची निवडणूकपूर्व युती होती. मात्र काँग्रेसचा मंत्रिमंडळात सामील झाला नाही. राज्याचा दर्जा नसल्याने आम्ही समाधानी नाही, असा युक्तिवाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा यांनी केला. शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, माकपचे प्रकाश करात, द्रमुकच्या कानिमोळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, पीडीपीच्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांची उपस्थिती होती. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकजूट दाखविण्याचा प्रयत्न केला. ९५ सदस्यीय काश्मीर विधानसभेत नॅशनल कॉन्फरन्सचे ४२ आमदार आहेत, तर काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. पाच सदस्य हे राज्यपाल नियुक्त आहेत