बिगरभाजप पक्षांची एकजुटीच्या प्रक्रियेला वेग आला असून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), जनता दल (सं), राष्ट्रीय जनता दल, माकप-भाकप अशा काही पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांचा या समितीमध्ये समावेश असेल. या ज्येष्ठ नेत्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि त्यांची श्रेष्ठता प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मत या घडामोडींशी संबधित असलेल्या राष्ट्रीय नेत्याने व्यक्त केले.
विरोधकांच्या ऐक्यासाठी जनता दलाचे (सं) प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला असून काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपचे ज्येष्ठ नेते डी. राजा यांच्याशी चर्चा केली आहे. संवाद साधण्यासाठी काँग्रेसला अडचणीचे ठरतील अशा पक्षांशी संवाद साधण्याची जबाबदारीही नितीशकुमारांनी उचललेली आहे. मात्र, ऐक्य प्रक्रिया टिकवण्यासाठी समन्वय समितीची गरज असल्याचा मुद्दा खरगे व राहुल गांधी यांच्या बैठकीत नितीशकुमार यांनी मांडला. या संदर्भात गुरुवारी शरद पवार यांच्या बैठकीतही चर्चा झाली. पुढील काळात दिल्लीमध्ये बिगरभाजप पक्षनेत्यांच्या बैठका होणार असून समन्वय समिती नेमण्यावरही शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
हेही वाचा – पुण्यात चंद्रकांतदादांना विरोधकांनी घेरले
पवारांना विनंती
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी विरोधकांच्या महाआघाडीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली असली तरी, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले नव्हते. मुंबईतील पूर्वनियोजित राजकीय बैठकांमुळे दिल्लीला येण्यामागील असमर्थता पवारांनी कळवली होती. तरीही खरगे व राहुल गांधींनी पवारांना दिल्लीला येऊन चर्चा करण्याची विनंती केली. दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या विनंतीला मान देऊन गुरुवारी संध्याकाळी पवार दिल्लीत दाखल झाले. या बैठकीमध्येही पवारांनी सावरकरांसारखे मतभेदाचे विषय बाजूला ठेवले पाहिजेत असे बजावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शैक्षणिक पदवी वगैरे मुद्दे महत्त्वाचे नसल्याचे पवारांनी यापूर्वीही जाहीरपणे सांगितले आहे. खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या पवारांच्या बैठकीमध्ये अदानीच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समजते.
हेही वाचा – कर्नाटकमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षविस्तार
पक्षप्रमुखांची बैठक?
खरगेंनी स्टॅलिन, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन आदी समविचारी प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांशी संपर्क साधला आहे. नितीशकुमार हे ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, चंद्रशेखर राव, चंद्रबाबू नायडू, नवीन पटनायक, जगनमोहन रेड्डी आदी पक्षप्रमुखांशी संपर्क करतील. त्यानंतर दिल्लीमध्ये या पक्षप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. या मॅरेथॉन बैठकांमध्ये मतभेदाच्या सर्व विषयांवर चर्चा होईल असे सांगितले जाते.