दिगंबर शिंदे
सांगली: फंदफितुरी रोखली नाही तर खानापूर-आटपाडीमध्ये राष्ट्रवादीचा आमदार होणे नाही अशी खदखद माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी विट्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत आ. शशीकांत शिंदे, आ. अरूण लाड यांच्या उपस्थितीत व्यक्त केली. पाटील गट हा चार वर्षापुर्वी राष्ट्रवादीत डेरेदाखल झाला असला तरी या गटाचा विस्तार विटा नगरपालिकेच्या बाहेर अद्याप होउ शकला नाही हे वास्तव विटा बाजार समितीच्या निवडणुकीत स्पष्ट झाले. यामुळे ही खदखद पक्षाचे वरिष्ठ नेते कितपत मनावर घेतात, यावर राष्ट्रवादीचा आमदार होणार की नाही हे ठरणार आहे. याचबरोबर पक्षाचा आमदार झाला तरी तो विट्याचा की आटपाडीचा हाही उपप्रश्न या निमित्ताने पुढे येणार आहे.
खानापूर आणि विटा या दोन तालुक्याचा हा विधानसभा मतदार संघ आहे. सध्या या ठिकाणचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे उपनेते अनिल बाबर यांच्याकडे आहे. या मतदार संघामध्ये दोन तालुके आहेत. याशिवाय तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातील गावांचाही समावेश या मतदार संघात आहे. आटपाडी तालुक्यापेक्षा खानापूर तालुक्याचे मतदान जास्त आहे. यामुळे केवळ आटपाडी तालुक्याची अस्मिता पुढे करून आटपाडीतील कोणीही विधानसभेत जाउ शकत नाही. विटा शहराची नगरपालिका कायमपणे पाटील गटाशी पाठीशी उभी राहिली आहे. ग्रामीण भाग बाबरांना मानणारा तर विटा शहरी भाग पाटलांना मानणारा, तर आटपाडीच्या देशमुख वाड्यावरचा आबंड कोणाच्या तराजूत पडेल तो आमदार अशी स्थिती कालपरवापर्यंत होती. मात्र, जिल्हा बँक, बाजार समिती आणि माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत ही परिस्थिती वेगाने बदलत असल्याचे स्पष्ट झाले.
आणखी वाचा-मविआच्या जागावाटपाच्या चर्चेआधीच काँग्रेसने बाह्या सरसावल्या; ४१ लोकसभा मतदारसंघांचा घेतला आढावा
आ. बाबर यांना पर्याय म्हणून विट्याच्या पाटील गटाला ताकद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने सुरू केले. काँग्रेसमध्ये प्रदेश उपाध्यक्ष असतानाही त्यांनी काँग्रेसचा त्याग केला. 2०१९ ची निवडणूक अपक्ष लढवली, मात्र, अपेक्षित विजय मिळवता आला नाही. भाजपचे गोपीचंद पडळकर मैदानात असूनही खासदार संजयकाका पाटील यांची मदत पाटलांना झाली. तथापि, ही मदतही अपुरी ठरली. आता मात्र, राष्ट्रवादीतून विधानसभा लढविण्याची तयारी माजी आमदार पुत्र वैभव पाटील यांनी सुरू केले असले तरी ते अंतिम लक्ष्य गाठतीलच याची खात्री त्यांना स्वत:ला देता येईना झाली आहे. तीच खदखद बूथ कमिटीच्या बैठकीत व्यक्त झाली.
आ. बाबर यांचा ग्रामीण भागात थेट संवाद, संपर्क आहे. ही त्यांची जमेची बाजू असली तरी आटपाडी तालुक्यातही त्यांना दुसर्यावर विसंबुन राहावे लागते. कारण देशमुख वाड्यातून मिळणारी रसद आता बंद झाली आहे, तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचाही राग बाबर यांच्यावर आहे. तर यशवंत कारखान्याचे जुने दुखणे खासदार गटाशी सोयरीक करण्यात अडचणीचे ठरले आहे. यातून आटपाडीतून जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांना पडद्याआड राष्ट्रवादीकडूनच मदत मिळत असल्याचा आरोप खुद्द अमरसिंह देशमुखांनी माणगंगा कारखान्याच्या निवडणुकीवेळी केला.
आणखी वाचा-कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर ‘मविआ’च्या तिन्ही पक्षांचा दावा
आमदार बाबर हे राष्ट्रवादीत असताना स्व. आरआर आबांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात. आजही आबा गटाची मदत आ. बाबर यांनाच होत असते. यामुळेच पाटील गटांने राष्ट्रवादीतील फंदफितुरी रोखली गेली नाही तर पुढचा आमदार राष्ट्रवादीचा होणे कठीण असल्याची भविष्यवाणी केली. राष्ट्रवादीची आटपाडीत बाबर गटाच्या पाटलांना मदत, दुसरीकडे विसापूरमध्ये आबा गटाची आ. बाबर यांना मदत अशा स्थितीत आमदारकीचे राष्ट्रवादीचे स्वप्न कसे पुर्ण होणार असा रास्त सवाल आहे. राष्ट्रवादीचे पक्ष विस्तारापेक्षा आपला गट कसा प्रबळ राहील याकडे लक्ष असल्याने विट्याच्या पाटलांची खंत नेतेमंडळी गांभीर्याने घेणार का हा प्रश्न निवडणुकीपर्यंत अनुत्तरितच राहणार आहे.