ओडिशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभेचीही निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये ओडिशामधील प्रमुख सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलाचा पराभव झाला आहे. त्यामुळे गेल्या २४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या बिजू जनता दलावर पहिल्यांदाच विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. गेली २५ वर्षे मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेले नवीन पटनाईक आता विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. बुधवारी (१९ जून) विधिमंडळातील बिजू जनता दलाने त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. नवीन पटनाईक यांनी १९९७ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर २००० साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बिजू जनता दलाला भाजपाबरोबर ओडिशामध्ये पहिल्यांदा सत्ता मिळाली आणि नवीन पटनाईक मुख्यमंत्रिपदी स्थानापन्न झाले, तेव्हापासून ते आजतागायत ते मुख्यमंत्री पदावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचाच भाजपात प्रवेश

त्यांच्यासोबत बीजेडीने ज्येष्ठ आमदार प्रसन्न आचार्य यांचीही विधिमंडळ पक्षाच्या उपनेतेपदी निवड केली. माजी सभापती प्रमिला मल्लिक यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. बैठकीनंतर बोलताना पटनाईक म्हणाले की, “बीजेडीच्या नवनिर्वाचित आमदारांबरोबर आम्ही नुकतीच एक बैठक घेतली आहे. आम्ही त्यांचे अभिनंदन केले आहे आणि आभारही मानले आहेत. त्यांनी माझी विरोधी गटनेतेपदी आणि विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. आम्ही नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.” एकीकडे पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना दुसऱ्या बाजूला नवीन पटनाईक यांची विरोधी पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. “लोकांनी दिलेला जनादेश आम्ही स्वीकारत आहोत; मात्र, मतांचा टक्का पाहिल्यास बिजू जनता दलाला ४०.२२ टक्के, तर भाजपाला ४०.०७ टक्के मते मिळाली आहेत; त्यामुळे आम्हीच क्रमांक एकचा पक्ष आहोत. आम्हाला असा आत्मविश्वास आहे की, आम्ही नक्कीच पुनरागमन करू, त्यासाठी पटनाईक आम्हाला आमच्याबरोबर हवे आहेत. म्हणूनच पटनाईक यांना विरोधी पक्षनेतेपदी निवडण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतला”, असे मत बीजेडीच्या एका नेत्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना व्यक्त केले. बीजेडीच्या एका वरिष्ठ नेत्याने असेही म्हटले की, पटनाईक बरोबर नसले तर बीजेडी पक्षाची अनेक गटांमध्ये शकले होऊ शकतात. ते म्हणाले की, “निकाल काहीही लागलेला असला तरीही त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. नवीनबाबू असतील तर पक्षही एकसंध राहील आणि बंडखोरी होण्याची शक्यता कमी असेल. पटनाईक यांच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही हे शक्य नाही.”

विरोधी पक्षनेता या नात्याने पटनाईक यांचे राज्याच्या विधानसभेच्या इमारतीतही कार्यालय सुरू राहील. ७७ वर्षीय नवीन पटनाईक मुख्यमंत्रिपदावर असताना फक्त गरजेच्या वेळीच विधानसभेच्या अधिवेशनाला हजेरी लावायचे. मात्र, आता त्यांना आपल्या ५१ आमदारांसहित एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून दक्ष राहून भूमिका बजवावी लागेल. रायराखोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रसन्न आचार्य म्हणाले की, “ओडिशाचा विकास आणि प्रगती करणे हेच आमचे उदिष्ट्य असल्याचे आम्ही वारंवार सांगत आहोत. आम्हाला आमच्या ध्येयाबाबत पुरेशी स्पष्टता आहे. एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम्ही जे ओडिशाच्या हिताचे काम करतील त्यांना पाठिंबा देऊ, तर जे त्या विरोधात काम करतील, त्यांच्या विरोधात उभे राहू.”

बिजू पटनाईक यांच्याबरोबर त्यांचे एकनिष्ठ आमदार असतील.

बिजू पटनाईक यांचे एकनिष्ठ आणि माजी एबीव्हीपी नेते – प्रसन्न आचार्य

प्रसन्न आचार्य हे चार वेळा आमदार राहिले आहेत. बिजू पटनाईक आणि नवीन पटनाईक यांच्या दोन्ही सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. ते पटनाईक यांचे निकटवर्तीय आणि एकनिष्ठ मानले जातात. ७५ वर्षीय प्रसन्न आचार्य हे १९९० साली पहिल्यांदा जनता दलाच्या तिकिटावर बारगढ मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी १९९५ मध्ये पुन्हा विजय मिळवला. त्यानंतर १९९८ साली ते संभलपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडले गेले. त्यांनी १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला.

हेही वाचा : उत्तर प्रदेशातल्या मतघसरणीची कारणं काय? भाजपा प्रत्यक्ष मैदानात उतरून घेणार आढावा

त्यानंतर आचार्य पुन्हा एकदा २००९ साली विधानसभा निवडणुकीमध्ये रायराखोल मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, त्यानंतर त्यांना बीजेपूरमधून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आणि बारगढमधून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दोन निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी २०२४ साली रायराखोलमधून पुन्हा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. विशेष म्हणजे प्रसन्न आचार्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित राहिले आहेत. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वातील संपूर्ण क्रांती आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. आणीबाणीच्या काळात ते १९ महिने तुरुंगातही गेले होते. मंत्री म्हणून त्यांनी अर्थ, आरोग्य, महसूल आणि उद्योग यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.

प्रमिला मलिक – माजी मंत्री

बीजेडीमधील महिलांचा प्रमुख आवाज म्हणून प्रमिला मलिक यांच्याकडे पाहिले जाते. त्या दलित नेत्या असून बिंझारपूर मतदारसंघातून सात वेळा आमदार राहिल्या आहेत. ६१ वर्षीय प्रमिला मलिक या १९९० साली पहिल्यांदा जनता दलाच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यांनी २००० पासून एकही निवडणूक हारलेली नाही. आतापर्यंत त्यांनी सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्रालय, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन अशी खाती सांभाळली आहेत. त्या बीजेडीच्या मागील सरकारमध्ये मुख्य प्रतोद होत्या.

प्रताप केशरी देब – राजघराण्याचे वंशज

पूर्वीच्या औल-कनिका राजघराण्याचे वंशज असलेले ५३ वर्षीय प्रताप केशरी देब हे पाचवेळा आमदार आणि माजी मंत्रीही राहिलेले आहेत. २००० साली ते पहिल्यांदा औल मतदारसंघातून निवडून आले. ते २०१२ साली पटनाईक सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री झाले. त्यावेळी त्यांनी अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण तसेच कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता ही खाती सांभाळली होती. २०२२ मध्ये पटनाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा पुन्हा समावेश करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ऊर्जा आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांसारखी महत्त्वपूर्ण खाती सांभाळली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naveen patnaik begins a new innings as opposition leader bjd odisha vsh
Show comments