आमचा बीजेडी पक्ष पुढील १०० वर्षे ओडिसा राज्यातील लोकांची सेवा करेल, असे विधान बीजेडी (बीजू जनता दल) पक्षाचे अध्यक्ष तथा ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी चार महिन्यांपूर्वी केले होते. त्यानंतर आता ओडिसामध्ये बीजेडी पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यालयाला ‘शंख भवन’ असे नाव देण्यात आले आहे. बीजेडी पक्षाच्या पक्षचिन्हात शंख आहे. त्यामुळे कार्यालयाच्या दर्शनी भागात शंखाची प्रतकृती उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या कामाला १२ जुलै २०२१ रोजी सुरुवात झाली होती.
हेही वाचा >>> निवडणूक आयोगाकडून काँग्रेस नेते शिवकुमार, भाजपाचे अन्नामलाई यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; राज्यात २५३ कोटींची रोकड जप्त
तीम मजली इमारतीचे उद्घाटन
बीजेडी पक्षाची नजरेत भरणारी ही नवी इमारत तीन मजल्यांची आहे. या इमारतीच्या बाहरेच्या बाजूने भगवान जगन्नाथ, भगवान बालभद्र, देवी सुवद्र यांच्या प्रतिमा आहेत. तसेच ओडिसा राज्यातील संस्कृती आणि वारशाचा उल्लेख करणारे स्टोन वर्कदेखील या इमारतीमध्ये करण्यात आले आहे. नवीन पटनाईक यांना बीजेडी हा पक्ष ओडिसामधील जनतेचे प्रतिनिधीत्व करतो, असा संदेश या कामातून द्यायचा आहे. इमारतीमध्ये ओडिसा राज्याने बीजेडी सरकारने मागील २३ वर्षांपासून काय-काय काम केले आहे, हे फोटोंच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
पक्षाचे मुख्यालय भगवान जगन्नाथ यांच्या वैभवशाली संस्कृतीचा प्रचार करेल- पटनाईक
या इमारतीच्या उद्धाटन कार्यक्रमातील भाषणातही बीजेडी आणि ओडिसा राज्याचा संबंध यावर नवीन पटनाईक यांनी भाष्य केले. “आज शंख भवनाचे उद्घाटन करण्यात आले. शंख भवन ओडिसाच्या फक्त भौतिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीयच नव्हे तर वसुधैव कुटुंबकम आणि जगन्नाथ संस्कृतीमध्ये रुजलेल्या अध्यात्मिक विकासाचेही ठिकाण असणार आहे. पक्षाचे मुख्यालय भगवान जगन्नाथ यांच्या वैभवशाली संस्कृतीचा प्रचार करेल. जनतेने ओडिसाचे वैभव जपण्यासाठी सेवा आणि विकासामध्ये आमच्यासोबत यावे,” असे नवीन पटनाईक म्हणाले.
हेही वाचा >>> Karnataka : काँग्रेसला १५० आणि भ्रष्ट भाजपाला केवळ ४० जागा मिळणार; निवडणुकीआधी राहुल गांधींचा दावा
भाजपाकडून ओडिसामध्ये विस्ताराचा पुरेपूर प्रयत्न
साधारण वर्षभरानंतर लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी येथे आतापासूनच केली जात आहे. भाजपाकडून ओडिसामध्ये विस्तार करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे पक्षकार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमातून ओडिसा राज्यावर आमचेच वर्चस्व आहे, असा संदेश नवीन पटनाईक यांना द्यायचा आहे, असे म्हटले जात आहे.
पक्षाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन नवे कार्यालय
वडील बीजू पटनाईक यांच्या मृत्यूनंतर नवीन पटानाईक यांनी बीजू जनता दल या पक्षाची स्थापन केली होती. बीजू जनता दलाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर बीजेडीचे उपाध्यक्ष प्रसन्न आचार्य यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “पक्षाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन हे नवे कार्यालय उभारण्यात आले आहे. बीजेडी पक्ष राज्यातील कानाकोऱ्यात पोहोचला आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या जागेची गरज होती. आमच्या पक्षाची सदस्यसंख्याही वाढत आहे. त्यामुळे आम्ही नवे पक्षकार्यालय उभारले,” असे आचार्य म्हणाले.
हेही वाचा >>>उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूती पण स्थानिक पातळीवर नेतृत्वाची पोकळी
दरम्यान, असोशिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या अहवालानुसार बीजेडी हा पक्ष देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बीजेडी पक्षाची संपत्ती ३०७ कोटी रुपये होते. प्रथम क्रमांकावर डीएमके पक्ष आहे.