ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे सोमवारी आपल्या पक्षाच्या मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. ओडिशा मंत्रिमंडळातील तीन मंत्रिपदे रिक्त आहेत. याठिकाणी तीन लोक मंत्रिपदाची शपथ घेतील. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याचे सागंण्यात येत आहे. शालेय शिक्षण मंत्री समीर रंजन दास आणि कामगार मंत्री श्रीकांत साहू यांनी काही काळापूर्वी राजीनामा दिल्यामुळे हे दोन मंत्रिपदे रिक्त आहेत. तसेच २९ जानेवारी रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नब किशोर दास यांची हत्या झाल्यानंतर त्यांचेही मंत्रिपद रिकामे होते. या तीनही जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

समीर रंजन आणि साहू या दोघांभोवती वाद निर्माण झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जाते. राज्यपाल गणेशी लाल हे सध्या त्यांच्या स्वतःच्या हरियाणा जिल्ह्यात गेलेले आहेत. ते रविवारी ओडिशामध्ये परतणार असल्याचे राजभवनातील सूत्रांनी सांगितले. राज्य लोकसेवा केंद्रात सोमवारी सकाळी ९.३० वाजता शपथविधी सोहळा संपन्न होईल, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली.

हे वाचा >> नितीशकुमार यांनी घेतली नवीन पटनाईक यांची भेट! बीजेडी मात्र विरोधकांना साथ देण्यास अनुत्सुक?

बिजू जनता दल पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री नवीन पटनाईक रविवारी संध्याकाळी फोनवरून त्यांच्या नवीन शिलेदारांना शपथविधीची माहिती देतील. मंत्रिमंडळात तरूण, वादाची पार्श्वभूमी नसलेल्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. ज्या नेत्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते, अशा संभाव्य नेत्यांनी गेल्या काही काळात ओडिशाच्या राजधानीत येऊन मंत्रिपदासाठी लॉबिंग केली होती.

मंत्रिमंडळात बदल करत असताना पटनाईक प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न करतील. ओडिशा राज्यात किनारपट्टी, पश्चिम आणि दक्षिण असे तीन भाग आहेत. मंत्रिपदाचा चेहरा निवडत असताना पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना समोर ठेवून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. महिलावर्गाच्या मतांना आकर्षित करायचे असल्यामुळे मंत्रिमंडळात महिला सहाकाऱ्याचाही समावेश होऊ शकतो. सध्या २१ जणांच्या मंत्रिमंडळात पाच महिलांचा समावेश केलेला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करत असतानाच मुख्यमंत्री विधानसभेच्या अध्यक्षपदाचेही नाव जाहीर करणार आहेत. बिक्रम केशरी अरुखा यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यापासून विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे.

हे वाचा >> पुरी लोकसभा मतदारसंघात संबित पात्रांची जोरदार तयारी सुरू; फोटोवरून ट्रोल झाल्यामुळे विरोधकांचे लक्ष्य

अरुखा हे मुख्यमंत्री पटनाईक यांच्या गंजम जिल्ह्यातील भंजानगर येथून सहा वेळा आमदार राहिलेले आहेत. १९९५ पासून ते निवडून येत आहेत. मागच्यावर्षी जून महिन्यात त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याआधी त्यांनी मंत्रिमंडळात अनेक विभागाचा कार्यभार सांभाळला होता. अरुखा यांची मंत्रिमंडळात पुन्हा एकदा वर्णी लागू शकते किंवा पक्ष संघटनेत त्यांना संधी देण्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Live Updates