नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी मुंबई महानगर पट्टयातील वेगवेगळ्या प्रकल्पांच्या लोकार्पणाची जय्यत तयारी सुरु असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी दिवसभर नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा दौरा करीत येथील वेगवेगळ्या प्रश्नांवर आक्रमक भूमीका घेतल्याचे पहायला मिळाले. दिघा रेल्वे स्थानकाचे रखडलेले लोकार्पण, नेरुळ परिसरातील पाणथळ जमिनींवर होणाऱ्या विकास प्रकल्पांमुळे पर्यावरण प्रेमींमधून उमटत असलेला नाराजीचा सुर आणि नव्या विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मुद्दयावरुन आदित्य यांनी केंद्र तसेच राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न यावेळी केला. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात आदित्य यांनी काढलेल्या दौऱ्याला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाल्याने पक्षातही उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत दुभंग झाल्याचे पहायला मिळाले. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या बंडामुळे नवी मुंबईत भाजपची ताकद वाढली असून या भागातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात या पक्षाचे आमदार आहेत. नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतरही याठिकाणी अखंड असलेल्या शिवसेनेची मोठी ताकद होती. मात्र पक्षातील बंडानंतर ९० टक्के नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची साथ धरली आणि उद्धव ठाकरे यांना या भागात मोठा धक्का बसला. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मात्र ठाकरे यांच्यासोबत रहाण्याचा निर्णय घेतल्याने लोकसभेसाठी सध्या तरी ठाकरे गटाकडे तयार उमेदवार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईत वेगवेगळ्या भागात दौरे सुरु केले असून रविवारी दिघा रेल्वे स्थानकाचे लोकार्पण तसेच बेलापूर विधानसभा क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रश्नांवर आक्रमक भूमीका घेत त्यांनी पक्षात जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : सांगलीत राष्ट्रवादी अंतर्गत फोडाफोडी जोरात
बेलापूरमध्ये पर्यावरणवाद्यांची साथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवडयात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मुंबई महानगर क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. नवी मुंबई विमानतळ परिसरात यानिमीत्ताने भव्य अशा सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. या सोहळयाची जय्यत तयारी सध्या सुरु असताना आदित्य यांनी रविवारी ठाणे-वाशी-बेलापूर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र आणि राज्य सरकारवर टिकेचे आसूड ओढले. हे स्थानक तयार असूनही केवळ लोकार्पणाच्या हव्यासापोटी ते प्रवाशांसाठी खुले केले गेले नाही असा आरोप ठाकरे यांनी केला. या भागात जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आदित्य यांनी बेलापूर मतदारसंघातील सानपाडा भागातील एका शाखेचे उद्धाटन केले. यावेळी नेरुळ परिसरात एका मोठया उद्योगपतीमार्फत उभ्या रहाणाऱ्या बांधकाम प्रकल्पामुळे होणाऱ्या खार जमिनीच्या नुकसानीचा मुद्दा त्यांनी जोरकसपणे लावून धरला. ठाणे जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी सलग तीन आठवडे या भागात पाणथळ जमिन वाचविण्यासाठी आंदोलन करत आहेत. नेमका हा मुद्दा लावून धरत आदित्य यांनी आपण पर्यावरण प्रेमींच्या सोबत आहोत अशी भूमीका त्यांनी घेतली. याशिवाय नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. आदित्य यांच्या या दोन्ही कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने चित्र यावेळी पहायला मिळाले. सानपाडा येथील दौरा आटोपताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळालेल्या प्रतिसादाबद्दल केलेला जल्लोषाची चर्चाही यानिमीत्ताने रंगली होती.
हेही वाचा : अजित पवार यांना कर्जतमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे शक्तिप्रदर्शनातून प्रत्युत्तर
“नवी मुंबईतील वेगवेगळ्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भूमीका आम्हा पक्ष कार्यकर्त्यांसाठीही स्वागतार्ह आहे. येथील पाणथळ जमिनी केंद्र सरकारशी निकटता राखून असलेल्या बड्या उद्योगपतींच्या प्रकल्पांसाठी गिळल्या जात असून ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करत येथील पर्यावरणवाद्यांसोबत उभे रहाण्याचे आदेश आम्हाला दिले आहेत.” – विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख – शिवसेना ठाकरे गट