नवी मुंबई : नवी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत गणेश नाईक नको असा धोशा लावत त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विरोधकांची ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठी कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेनेने (ठाकरे) एम.के.मढवी यांना उमेदवारी दिली असून ऐरोलीतील तीन प्रभागांपुरता प्रभाव असलेल्या मढवी यांचेही राजकारणात मित्र कमी शत्रु अधिक अशी परिस्थिती आहे. शिंदेसेना, काॅग्रेस आणि स्वपक्षातही अनेकांचे मढवी यांच्याशी अजिबात सख्य नाही. त्यामुळे नाईकांना टोकाचा विरोध असणाऱ्यांची या मतदारसंघात दुहेरी कोंडी झाली असून यंदा परिस्थिती फारशी अनूकुल नसतानाही ही राजकीय रचना नाईकांच्या पथ्यावरच पडली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ऐरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना जेमतेम नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. बेलापूरच्या तुलनेत ऐरोली हा झोपडपट्टी, सिडकोची लहान घरे, माथाडी वसाहती, दाटीवाटीने वसलेल्या गावांचा मिळून बनलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दलीत, मुस्लिम, मराठी असा मतदारांचे प्रमाण बेलापूरच्या तुलनेत अधिक आहे. गणेश नाईक यांनी या मतदारसंघातून पाच वर्षांपुर्वी ८२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला खरा मात्र त्यावेळी त्यांना बऱ्यापैकी एकसंघ शिवसेनेची साथ मिळाली होती. नाईकांनीही त्यावेळी प्रचारात शिवसेनेचे स्थानिक नेत्यांना सोबत घेतले होते. मागील पाच वर्षात मात्र नाईक आणि त्यांच्या विरोधकांमधील दरी वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि नाईक यांच्यात विस्तवही जात नाही. काॅग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे जमत नाही. उद्धव सेनेतील अनेकांना नाईक आपलेशे वाटत नाहीत तर आपल्या समर्थकांच्या कोंडाळ्यातून नाईकांनीही सर्वपक्षीय समझोत्याच्या राजकारणाला कधी आपलेसे केलेले नाही. यामुळे यंदा ऐरोलीत नाईक नकोच अशी भूमीका घेत सर्वपक्षीय नेते मंडळी एकवटतील अशी चिन्हे असताना उद्धव सेनेचे एम.के.मढवी यांना उमेदवारी देऊन स्वपक्षाचीच कोंडी केल्याचे चित्र दिसू लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समर्थक असलेला एक मोठा गट नाईकांच्या विरोधात आहे. नाईक यांच्याविरोधात शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी रिंगणात उतरावे असे या गटाचे म्हणणे आहे. चौगुले हे देखील नाईकांना आव्हान देण्यास तयार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांपुढे त्यांचे चालेनासे झाले आहे. नाईक यांच्या विरोधात यंदा काॅग्रेसकडून माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचे पुत्र अनिकेत यांनी मतदारसंघात चांगली बांधणी केली होती. मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ उद्धव सेनेकडे गेला. अनिकेत यांनी बंडखोरी करावी यासाठी नाईक विरोधक त्यांना गळ घालताना दिसत आहेत. मात्र म्हात्रे त्यास तयार नाहीत. चौगुले आणि म्हात्रे अशा दोघांची झालेली कोंडी नाईकांच्या पथ्यावर पडली आहे.
एम.के.मढवी यांनाही सर्वपक्षीय विरोध
नवी मुंबई महापालिकेत सलग चार वेळा निवडून गेलेले एम.के.मढवी हे एकेकाळचे कट्टर नाईक समर्थक मानले जात. पुढे संदीप नाईक यांच्याशी त्यांचे बिनसले आणि ते शिवसेनेत गेले. शिवसेना फुटली तसे ते उद्धव गोटात राहीले. या काळात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले, त्यांना तडीपारही करण्यात आले. त्यानंतरही एम.के.मढवी यांनी उद्धव यांची साथ सोडली नाही. त्याची बक्षीशी म्हणून त्यांना ही उमेदवारी देण्यात आली असली तरी मढवी यांनाही सर्वपक्षीय नेत्यांचा मोठा विरोध आहे. नाईक यांचे कडवे विरोधक असलेले मुख्यमंत्री समर्थक नेते विजय चौगुले आणि मढवी यांच्यात बेबनाव आहे. मढवी यांना उमेदवारी देताच उद्धव यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी राजीनामा दिला. रमाकांत म्हात्रे आणि मढवी यांचे राजकीय संबंध चांगले नाहीत. नाईक यांच्या विरोधात असलेल्या शिंदे सेनेच्या अनेक नेत्यांना मढवी यांच्याशी देखील सख्य नाही. त्यामुळे नाईक नकोत हे जरी खरे असले तरी मढवी यांना तरी मदत कशी करायची अशा चक्रव्युहात सध्या नाईक विरोधक सापडल्याचे चित्र आहे.