ठाणे : महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क सुरु आहेत. ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेच्या पारड्यात पडणार याविषयी हळूहळु स्पष्टता येत असली तरी भाजपचा एखादा चेहरा धनुष्यबाण या चिन्हावर लढेल का याविषयी देखील मतदारसंघात चर्चा सुरु आहे. या चर्चांमुळे अस्वस्थ झालेल्या नवी मुंबई शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत उमेदवार आपलाच द्या, असा आग्रह त्यांच्यापुढे धरल्याचे सांगितले जाते. भाजप नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबातील कुणालाही उमेदवारी दिली गेली तर नवी मुंबईत संघटनेत उद्रेक पहायला मिळेल अशी भूमिकाही पक्षाच्या काही नेत्यांनी मांडल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अरविंद केजरीवालांच्या अटकेचा फायदा आम आदमी पक्षाला की भाजपाला? जाणून घ्या, त्यामागचे राजकारण

महायुतीच्या जागा वाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली दरबारी मोठी कसरत करावी लागल्याची चर्चा आहे. या मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. या मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असून मीरा-भाईदर भागातील अपक्ष आमदार गीता जैन या देखील पुर्वाश्रमीच्या भाजप नेत्या आहेत. हा मतदारसंघ भाजपला मिळेल या आशेवर असलेल्या या लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांनी गेल्या वर्षभरापासून वातावरणनिर्मीतीला सुरुवात केली होती. नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांचे माजी खासदार पुत्र संजीव नाईक, भाजप नेते डाॅ.विनय सहस्त्रबुद्धे तसेच आमदार संजय केळकर अशी काही नावे सतत चर्चेत होती. मात्र महायुतीच्या चर्चे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ठाण्यावर जोरदार दावा केला. मुख्यमंत्री ज्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येतात तो ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला देणे हे राजकीयदृष्टया परवडणारे नाही अशी भूमीका मुख्यमंत्र्यांच्या गोटातून मांडण्यात आली. दरम्यान दिल्ली दरबारी केलेल्या शिष्टाईला यश मिळाल्याची चर्चा असून ठाणे शिंदे यांच्या शिवसेनेलाच मिळेल असे आता ठामपणे सांगितले जात आहे.

हेही वाचा : महायुतीकडून परभणीत विटेकर की बोर्डीकर ? भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात नाराजी

उमेदवारही पक्षाचाच हवा

ही जागा मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला सुटत असली तरी येथून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अजूनही स्पष्टता नाही. शिवसेनेचे ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर मिनाक्षी शिंदे अशी काही नावे या पक्षातून चर्चेत असली तरी नेमकी कुणाची निवड होईल याविषयी कमालिचा संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून भाजपचा उमेदवार आयात केला जाईल का याविषयीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. माजी खासदार संजीव नाईक यांना धनुष्यबाणावर लढविले जाऊ शकते अशी चर्चाही सुरु आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या नवी मुंबईतील शिवसेनेच्या नेत्यांनी दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेत काहीही झाले तरी ठाणे आपल्याकडेच ठेवा असा आग्रह धरल्याचे सांगितले जाते. नवी मुंबईत पक्षात नाईकांविषयी कमालिची नाराजी असून त्यांच्या कुटुंबातून कुणाचाही विचार झाल्यास पक्षात उद्रेक होईल अशी भावनाही मुख्यमंत्र्यांपर्यत या नेत्यांनी पोहचविल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे मात्र ऐकून घेतल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाला मित्र पक्षाकडून आव्हान

ठाणे शिवसेनेलाच मिळायला हवा आणि पक्षाचा उमेदवार असायला हवा अशी भूमीका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडली. ते जो आदेश देतील तसे काम आम्ही करु. मात्र आम्ही आमच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या.

विजय चौगुले, जिल्हाप्रमुख शिवसेना नवी मुंबई</strong>
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai shivsena leaders urge cm eknath shinde we dont want ganesh naik from thane lok sabha print politics news css