अमरावती : गेल्‍या वर्षी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्‍यानंतर चर्चेत आलेल्‍या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आता ‘हिंदुत्‍वा’ची ‘कार्यक्रम पत्रिका’ तयार केली असून आगामी लोकसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी मानली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राणा दाम्‍पत्‍याने अमरावतीत १११ फूट उंचीची हनुमानाची मूर्ती उभारण्‍याची तयारी केली आहे. वर्षभरात या मूर्तीची प्राणप्रतिष्‍ठा करण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी हनुमान जयंतीच्‍या निमित्‍ताने आयोजित सामूहिक हनुमान चालिसा पठणाच्‍या कार्यक्रमात जाहीर केला. त्‍याआधी नवनीत राणा यांचा ‘हिंदू शेरणी’ असा उल्‍लेख असलेले मोठमोठाले फलक अमरावती, मुंबईत लागले. गेल्‍या वर्षभरात राणा दाम्‍पत्‍याने उद्धव ठाकरे यांच्‍यावर टीका करण्‍याची एकही संधी सोडलेली नाही.

गेल्‍या वर्षीच्‍या गुढीपाडव्‍याच्‍या मेळाव्‍यात मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे, अन्‍यथा मशिदीसमोर दुप्‍पट लाऊड स्‍पीकरवर हनुमान चालिसा लावू, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला होता. त्‍यानंतर लगेच राणा दाम्‍पत्‍याने अमरावतीतील मंदिरांमध्‍ये हनुमान चालिसा लावण्‍यासाठी मोफत भोंग्‍यांचे वाटप केले. राज ठाकरे यांच्‍या भूमिकेवरून उठलेले वादळ शांत झालेले नव्‍हते, तोच राणा दाम्‍पत्‍याने उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्‍याचा हट्ट धरला. त्‍यानंतर शिवसैनिकांची जोरदार निदर्शने, राणा दाम्‍पत्‍यावर दाखल झालेला राजद्रोहाचा गुन्‍हा, अटक, १४ दिवसांचा तुरुंगवास हा घटनाक्रम घडला. राणा दाम्‍पत्‍याने यातून राष्‍ट्रीय माध्‍यमांचे लक्ष वेधून घेतले होते.

हेही वाचा – हरियाणामध्ये भाजपा-जेजेपी यांच्यात पुन्हा युती होणार? उपमुख्यमंत्री चौटाला यांच्या प्रतिक्रियेनंतर संदिग्धता!

काँग्रेस, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आलेल्‍या नवनीत राणा यांनी केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला. पण, राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार स्‍थापन झाले. त्‍याआधी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्‍यावर थेट टीका केल्‍याचे ऐकिवात नव्‍हते. पण, सप्‍टेंबर २०२० मध्‍ये करोना काळात परिस्थिती हाताळण्‍यात राज्‍य सरकार अपयशी ठरल्‍यामुळे राज्‍यात राष्‍ट्रपती राजवट लागू करण्‍याची मागणी त्‍यांनी केली होती. त्‍यातून त्‍यांनी आपली दिशा स्‍पष्‍ट केली होती.

२०१९ च्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. त्‍याआधी २०१७ मध्‍ये नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मुंबई उपनगर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवला असल्याचा आरोप करत आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०२१ रोजी नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. सद्यस्थितीत या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असून येणाऱ्या काळात त्यावर निकाल अपेक्षित आहे.

हेही वाचा – रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गटातील वाद पुन्हा उफाळला

या निकालावर नवनीत राणा यांचे राजकीय भवितव्‍य अवलंबून आहे, पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. अडसूळ हे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासोबत आहेत. त्‍यामुळे विरोधाची धार कमी झाली असली, तरी ठाकरे गटाचे कार्यकर्ते राणा दाम्‍पत्‍याच्‍या विरोधात त्‍वेषाने उभे ठाकले आहेत. राणा दाम्‍पत्‍याने ‘हिंदुत्‍वा’चा विषय पुढे रेटण्‍याचा प्रयत्‍न चालवला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्‍या अयोध्‍या दौऱ्याच्‍या वेळी रवी राणा यांना अग्रस्‍थान मिळाल्‍याने त्‍याचीही चर्चा रंगली. उद्धव ठाकरे यांना सातत्‍याने लक्ष्‍य करून आगामी काळात राणा दाम्‍पत्‍याला कोणते राजकीय लाभ मिळतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.