मोहन अटाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती शहरानजीक नवनिर्मित हनुमान गढी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्‍या शिवमहापुराण कथेच्‍या आयोजनातून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केलेल्‍या राजकीय प्रचाराची चर्चा आता रंगली आहे. कथेच्‍या अखेरच्‍या दिवशी पंडित मिश्रा यांनी धर्माचे कार्य करणाऱ्यांच्‍या पाठीशी उभे रहावे असे सांगून राणांना मतांचे दान करा, असे आवाहन केले. त्‍यातून धार्मिक प्रवचनापेक्षा स्‍वप्रचाराचा राणा दाम्‍पत्‍याचा अंतस्‍थ हेतू उघड झाला.

शहरालगत मालखेड मार्गावर हनुमानाची १११ फूट उंच मुर्ती स्‍थापन करण्‍याचा संकल्‍प राणा दाम्‍पत्‍याने केला आहे. या मुर्तीच्‍या उभारणीचे काम सुरू झाले आहे. या परिसराला हनुमान गढी असे नाव देण्‍यात आले आहे. याच ठिकाणी कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्‍या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. पहिल्‍याच दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोहचून राणा दाम्‍पत्‍याचे कौतुक केले. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्‍वाचे विचार पुढे नेण्‍याचे काम आम्‍ही करीत आहोत, असे त्‍यांनी सांगितले खरे, पण माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍यावर टीका करण्‍याची संधी त्‍यांनी सोडली नाही. या टीकेला संदर्भ होता, तो हनुमान चालिसा पठणाचा. सुमारे दीड वर्षांपुर्वी मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्‍याच्‍या मुद्दयावर आक्रमक भूमिका घेतली होती. राणा दाम्‍पत्‍याने लगेच हा विषय हाती घेतला.

हेही वाचा… संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे ?

राणा दाम्‍पत्‍याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा करून कायदा-सुव्यवस्था निर्माण केली, या आरोपाखाली गुन्हा नोंदवल्यानंतर २३ एप्रिल २०२२ रोजी अटकेवेळी त्यांनी पोलिसांना कर्तव्य करण्यापासून रोखल्याबद्दल दुसरा गुन्‍हाही दाखल झाला. पण, हनुमान चालिसा पठण केले म्‍हणून उद्धव ठाकरे सरकारने अटक करून तुरूंगात डांबले, हा मुद्दा राणा दाम्‍पत्‍याने सातत्‍याने चर्चेत ठेवला आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवमहापुराण कथेच्‍या निमित्‍ताने या घटनेची पुन्‍हा आठवण करून दिली. ज्‍यांनी हनुमान चालिसा पठनाला विरोध केला, त्‍यांच्‍या सत्‍तेच्‍या लंकेचे हनुमानाच्‍या कृपेने लंकादहन झाले आणि परिवर्तन झाले. श्रीराम प्रभू आणि हनुमानाच्‍या आशीर्वादाने सर्वसामान्‍यांच्‍या मनातले सरकार स्‍थापन झाले, अशा शब्‍दात मुख्‍यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, त्‍यांच्‍यावर टीका केली. कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आलेल्‍या राणा दाम्‍पत्‍याने स्‍वीकारलेल्‍या हिंदुत्‍वाच्‍या भूमिकेचा साक्षात्‍कार कथावाचन कार्यक्रमातून घडला.

हेही वाचा… कोकणातील जलविद्युत प्रकल्पाला पाणी देण्यास कोल्हापुरातील सर्वपक्षीयांचा विरोध

अयोध्‍येत २२ जानेवारीला श्रीराम मंदीर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्‍येने लोकांनी अयोध्‍येत एकत्र यावे, असे आवाहन करण्‍यात आले. कथा वाचन कार्यक्रमात अयोध्‍येतील सत्‍येंद्रनाथ महाराज हेही सहभागी झाले होते. राणा दाम्‍पत्‍याने जिल्‍ह्यात भाजपपेक्षाही प्रखर हिंदुत्‍वाची भूमिका घेतल्‍याची चर्चा त्‍यामुळे रंगली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी धार्मिक ध्रुवीकरणाचा राणा दाम्‍पत्‍याचा प्रयत्‍न आहे. शिवमहापुराण कथेच्‍या निमित्‍ताने त्‍यांनी मतांची पेरणी केली. त्‍याचा त्‍यांना कितपत लाभ मिळेल, हे नजीकच्‍या काळात दिसून येईल, पण या निमित्‍ताने शहरातील पुरोगामी विचारांच्‍या लोकांनी अशा प्रकारच्‍या आयोजनातून अंधश्रद्धेचा प्रचार होत असल्‍याचे सांगून राणा दाम्‍पत्‍याची कोंडी करण्‍याचा प्रयत्‍न केला. संत गाडगेबाबा आणि राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांची छायाचित्रे आयोजनस्‍थळी लावण्‍यावरही आक्षेप घेतला गेला.

हेही वाचा… तटकरे यांचे विश्वासू सहकारी सुरेश लाड भाजपमध्ये राष्ट्रवादीला धक्का

कथावाचन स्‍थळी मोठे शिवमंदिर उभारण्‍याची घोषणा आमदार रवी राणा यांनी केली आहे. हनुमान गढी हे ठिकाण पर्यटनस्‍थळ म्‍हणून विकसित करण्‍याचा रवी राणांचा प्रयत्‍न आहे. हे स्‍थळ खासगी जमिनीवर असले, तरी जवळच पोहरा-मालखेडचे जंगल आहे. या भागात मानवी हस्‍तक्षेप वाढल्‍यास वन्‍यजीवांच्‍या अधिवासाला धोका निर्माण होईल, असा पर्यावरण प्रेमींचा आक्षेप आहे. दीड वर्षांत ज्‍या वेगाने या ठिकाणी कामे झाली, त्‍यातून अमरावतीकर अचंबित झाले आहेत. खासगी कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणा राबवली, त्‍याबद्दल भीम ब्रिगेड या संघटनेने प्रश्‍न उपस्थित केले आहेत. राणा दाम्‍पत्‍याला या आयोजनातून कितपत लाभ होईल, याची उत्‍सूकता राजकीय वर्तुळात आहे.

पुढील वर्षी याही पेक्षा भव्‍य शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्‍यात येणार असून पंडित प्रदीप मिश्रा यांनी त्‍यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती करण्‍यात आली आहे. हनुमान गढी येथे भव्‍य शिव मंदिराची उभारणी करण्‍यात येणार आहे. सिहोर येथील कुबेरेश्‍वर धाममधील मातीने येथील मंदिराची पायाभरणी केली जाणार आहे. – रवी राणा, आमदार, बडनेरा.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana and ravi rana trying to conquer votes by organizing events like shiv mahapuran katha print politics news asj