अलिबाग : रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीत सुरु झालेला वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधील दोन्ही घटक पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे सामोपचाराने यावर तोडगा निघेल अशी चिन्ह दिसून येत नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी म्हसळा आणि तळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले होते. यात रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आणि सुनील तटकरे हेच महायुतीचे उमेदवार असतील, आमचा पक्ष पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवेल असे त्यांनी जाहीर केले होते. भाजपने कितीही दावा सांगितला तरी रायगडची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले होते.

अजित पवार यांच्या या घोषणेनंतर भाजप एक पाऊल मागे येईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. भाजप अजूनही या जागेसाठी आग्रही असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पेण येथे झालेल्या पक्षाच्या बुथ कार्यकर्ता मेळाव्यात भाजपने पुन्हा एकदा या जागेवर दावा सांगितला. यावेळी भाजपचे पक्ष निरीक्षक आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत उपस्थित होते. ही जागा भाजपला मिळायला हवी आणि धैर्यशील पाटील हेच उमेदवार असायला हवेत, नाहीतर फार वाईट घडेल असा थेट इशाराच आमदार रविंद्र पाटील यांनी या मेळाव्यात पक्षनिरक्षकांना देऊन टाकला.

हेही वाचा : जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच

त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद पन्हा ऊफाळून येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे रायगडचे उमेदवार नको, असा अट्टाहास भाजपच्या जिल्हाकार्यकारीणीने लावून धरला आहे. आधी पक्षाचे कोकण संघटक असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्याकडे आणि आता पक्ष निरीक्षक असलेल्या प्रमोद सावंत यांच्याकडे त्यांनी ही मागणी लावून धरली आहे. अखेर कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्टींकडे पोहोचवीन, कोकणच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे प्रमोद सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपच्या या आक्रमक भुमिकेमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मात्र चांगलीच कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : मोदींच्या सभेने महायुतीचा उत्साह वाढला, यवतमाळ मतदारसंघ भाजप की शिंदे गटाकडे ?

लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे. तसा दोन्ही पक्षातील तणाव आणि धूसफूस वाढण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेनी विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे जागा त्यांनाच मिळावी, तेच योग्य आहे, असे म्हणत तटकरेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी यावर कोणता तोडगा काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader